आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १५ एप्रिलपासून स्पंदन राज्यस्तरीय युवा महोत्सव

  • By admin
  • April 3, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

नाशिक : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक कौशल्य वाढीस लागावेत याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय स्पंदन युवा महोत्सव कार्यक्रमाचे १५ एप्रिलपासून राज्यातील विविध महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे राज्यातील सर्व संलग्नीत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांच्या प्रतिभांची व क्षमतांची ओळख करणे, त्यांच्यामध्ये सांस्कृतीक वृत्ती निर्माण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकारांना तयार करणे, विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी दरवर्षी विद्यापीठाद्वारे विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ’स्पंदन’ चे आयोजन करण्यात येते.

नागपूर विभागातील गोविंदराव वंजारी आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र नागपूर येथे १५ व १६ एप्रिल, नाशिक विभागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय कोपरगाव येथे १८ व १९ एप्रिल, पुणे विभागातील शारदाबाई पवार इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, बारामती येथे २१ व २२ एप्रिल, मराठवाडा विभागातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजीओथेरेपी, लातूर येथे २५ व २६ एप्रिल, कोल्हापूर विभागातील सिध्द्गिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे २८ व २९ एप्रिल अंदाजित तारखांना घोषित करण्यात आले आहे.

विद्यापीठाचा ’’स्पंदन-२०२५’’ सांस्कृतिक युवा महोत्सवात संगीत प्रकारामध्ये सुगम संगीत, पाश्चिमात्य गायन, भारतीय समूहगान, पाश्चिमात्य समूहगायन, लोकसंगीत, पाश्चिमात्य वाद्य संगीत, नाट्य संगीत तसेच नृत्य प्रकारामध्ये लोक/आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य तसेच साहित्य कला प्रकारामध्ये सामान्य चाचणी, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच नाटयकला प्रकारामध्ये एकांकिका, विडंबन नाट्य, मुकअभिनय समूह, मिमिक्री तसेच ललित कला प्रकारामध्ये जलद चित्रकला स्पर्धा, चिकट चित्र स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, मृदशिल्प स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्थळ छायाचित्रण, लघु चित्रपट आदी प्रकारांचा समावेश आहे.

सर्व महाविद्यालयांनी संपूर्ण भरलेली प्रवेशिका ९ एप्रिलपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावी. या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयानी नोंदणी शुल्क जमा करुन विविध २८ कला प्रकारांकरीता विद्यार्थी स्पर्धक, संगीत साथीदार व संघ व्यवस्थापक असे संघ पाठवावे. याकरिता नोंदणी अर्ज, सूचना नियमावली व माहितीपत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 0253-2539171 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *