
रायगडची अष्टपैलू खेळाडू रोशनी पारधीचा समावेश
रायगड ः रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी रोशनी पारधीची महाराष्ट्राच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या रोशनीने गतवर्षी झालेल्या महाराष्ट्राच्या पंधरा वर्षांखालील आंतर जिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रोशनी ही जलदगती गोलंदाज व सलामीवीर फलंदाज असून तिने सातत्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघासाठी केले आहे.
एसबीसी महाड क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आवेश चिचकर, अध्यक्ष बशीर चिचकर यांनी रोशनीच्या खेळामधील प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहेत परिणामी तिची निवड आज महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात झाली. रोशनी पारधी हिचे वडील रविंद्र पारधी, एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाडचे अध्यक्ष बशीर चिचकर व मुख्य प्रशिक्षक आवेश चिचकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रोशनी हिने सातत्याने क्रिकेट खेळासाठी घेतलेली मेहनत व केले अथक परिश्रम यांचे चीज झाले असल्याचे सांगितले. भविष्यात तिची निवड महाराष्ट्राच्या मुलींच्या वरिष्ठ गटात व त्यानंतर भारतासाठी तिचे निवड व्हावी हीच आपली इच्छा असल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रोशनी व तिच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. रायगडच्या खेळाडूंकडे गुणवत्ता आहे फक्त त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, रोशनीला भविष्यात लागेल ती मदत आरडीसीएतर्फे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आरडीसीए सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व क्रिकेट प्रेमी लोकांनी रोशनीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.