
महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत, रेल्वे, कोल्हापूरच्या पुरुष संघाची आगेकूच
पुरी (ओडिशा) ः महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी आपली विजयी लय कायम ठेवत ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रेल्वे आणि कोल्हापूरच्या पुरुष संघांनीही प्रभावी कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३१-२४ असा पराभव केला. हाफ टाइमनंतरच्या डावात पश्चिम बंगालने १६-१० अशी जोरदार लढत दिली होती. मात्र मध्यंतराची २१-८ अशी निर्णायक आघाडी महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. यात महाराष्ट्राच्या पियुष घोलम याने आपल्या धारदार आक्रमणात ६ गडी बाद केले. शुभम थोरातने २.३० मि. संरक्षण व नरेंद्र कातकडेने १.५० व १.१० मि. संरक्षणाची खेळी केली. कोलकत्ताच्या सुमन बर्मन (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याची अष्टपैलू खेळी व सुमन डेबनाढ (१० गुण) याची आक्रमणाची खेळी अपुरी पडली.
यापूर्वी झालेल्या सामन्यात महाराष्ट्रने महाराष्ट्र पोलिस संघाचा २८-१४ असा एक डाव राखून १४ गुणाने दणदणीत विजय मिळविला. यात सुयश गरगटे (नाबाद २.३० मि. संरक्षण व ६ गुण ) व प्रतीक वाईकर (१.१० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी करत विजय सोपा केला. महाराष्ट्र पोलिसकडून मनोज घोटेकर (१.०० मि. ४ गुण) याचा अष्टपैलू खेळ एकाकी होता.
महिला गटात महाराष्ट्राची विजयी घोडदौड
महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रने कोल्हापूरवर २०-१४ असा एक डाव राखून सहा गुणांनी दणदणीत विजय मिळवला. प्रियंका इंगळेने कोल्हापूरचे आक्रमण खिळखिळीत करत तब्बल ५.१८ मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गुण वसूल करून विजय निश्चित केला. पायल पवार (२.२२ मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली साथ विजयात भर घालणारी ठरली. कोल्हापूरच्या श्रावणी पाटीलची (१.४५ मि. संरक्षण व २ गुण) खेळी फुकट गेली.
तत्पूर्वी. महाराष्ट्रने केरळचा ४४-१० असा ३४ गुणांनी धुव्वा उडवला होता. यातही प्रियांका इंगळेने (३.३२ मि. १२ गुण ) अष्टपैलू कामगिरी बजावली होती.
इतर उपांत्यपूर्व निकाल
अन्य उपांत्यपूर्व निकाल : पुरुष गट : ओडिशा विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश २९-२६, कोल्हापूर विजयी विरुद्ध कर्नाटक ३२-२५, रेल्वे विजयी विरुद्ध केरळ ३७-२४.
महिला गट : दिल्ली विजयी विरुद्ध कर्नाटक २६-२२, एअरपोर्ट ऑथोरिटी विजयी विरुद्ध गुजरात २१-१३, आंध्र प्रदेश विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश २४-१९.
असे होणार उपांत्य सामने
पुरुष गट : महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा, रेल्वे विरुद्ध कोल्हापूर.
महिला गट : महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, एअरपोर्ट ऑथोरिटी विरुद्ध आंध्र प्रदेश.
