
सोलापूर : एमसीए १९ वर्षांखालील दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने ईस्ट झोन संघावर एक डाव १४ धावांनी विजय संपादन केला.
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी बाद ३७४ धावांवर डाव घोषित केला. ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात १३१ धावा केल्या. त्यानंतर फॉलोऑनमध्ये खेळताना दुसऱ्या डावात २२९ धावा केल्या.

सोलापूर संघाकडून फलंदाजी करताना सुमित अहिवळे याने ११४ धावा केल्या. अथर्व देशमाने याने ८७ धावा तसेच वीरांश वर्मा याने ४२ धावांचे योगदान दिले. ईस्ट झोन संघाच्या पहिल्या डावात समर्थ दोरनाल याने पाच बळी घेतले. दुसऱ्या डावात समर्थ दोरनाल याने सहा बळी घेतले. दोन्ही डावात समर्थ दोरनाल याने ११ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार समर्थ दोरनाल याला प्रदान करण्यात आला.
सोलापूर संघाचा पुढील सामना पाच व सहा एप्रिल रोजी सीएनए संघा बरोबर होणार आहे. सोलापूर संघाने बोनस गुण घेऊन ७ गुण प्राप्त केले आहेत. सोलापूर संघ १३ गुण घेऊन सध्या प्रथम क्रमांकावर आहे. सोलापूर संघाचे अजून दोन सामने राहिले आहेत.