
हार्दिक पंड्याचे पाच विकेट, सूर्यकुमार यादवीची ६७ धावांची धमाकेदार खेळी व्यर्थ
लखनौ : लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर रोमांचक लढतीत १२ धावांनी विजय नोंदवला. आयपीएल स्पर्धेत मुंबई संघाचा हा चार सामन्यातील तिसरा पराभव होता. सूर्यकुमार यादव ६७ धावांवर बाद झाला आणि मुंबईच्या विजयाची आशा संपुष्टात आली. मिशेल मार्श व मार्करम यांची दमदार कामगिरी प्रभावी ठरली.
मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य होते. विल जॅक्स व रायन रिकेलटन ही सलामी जोडी झटपट तंबूत परतल्याने मुंबई संघ मोठ्या अडचणीत सापडला. आकाश दीप याने विल जॅक्सला ५ धावांवर तर शार्दुल ठाकूर याने रिकेलटन याला १० धावांवर बाद करुन मुंबईला मोठा धक्का दिला.
तिसऱ्याच षटकात दोन बाद १७ अशी बिकट स्थिती असताना नमन धीर याने धमाकेदार फलंदाजी करत धावगतीला एकदम वेग दिला. नमन याने २४ चेंडूत ४६ धावा फटकावल्या. त्याने तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. दिग्वेश राठी याने नमन याला क्लीन बोल्ड करुन ही धोकादायक जोडी फोडली.
सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या बहारदार फटकेबाजी करणाऱ्या जोडीने चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. अवेश खान याने सूर्यकुमार यादवची ४३ चेंडूतील ६७ धावांची धमाकेदार खेळी संपुष्टात आणली. सूर्यकुमार याने नऊ चौकार व एक षटकार मारला. मुंबई संघाकडून १००वा आयपीएल सामना खेळताना त्याने सुरेख अर्धशतक ठोकले. परंतु, संघाला गरज असताना तो बाद झाला आणि मुंबई संघाकडून विजय दूर गेला. तिलक वर्मा दुखापतीमुळे २५ धावांवर निवृत्त झाला. त्यानंतर हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी आली. हार्दिक याने १६ चेंडूत नाबाद २८ धावांचे योगदान दिले. परंतु, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. २० षटकात पाच बाद १९१ धावा काढत मुंबईने १२ धावांनी पराभव स्वीकारला. शेवटचे षटक अवेश खान याने प्रभावी टाकले आणि संघ मालक संजीव गोयंका यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले.

लखनौ सुपरजायंट्स ८ बाद २०३
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २०३ धावसंख्या उभारुन मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात लखनौ संघाला धमाकेदार सुरुवात मिळाली. मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम या सलामी जोडीने संघाला अतिशय धमाकेदार सुरुवात करून दिली. मार्करामने ५३ धावा केल्या आणि मिचेल मार्शने ६० धावांची दमदार खेळी केली. ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंत याने फक्त २ धावा काढल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्याने एलएसजीच्या फलंदाजांवर कहर केला आणि एकूण ५ बळी घेतले.
मुंबई इंडियन्सने डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी केली. याआधी, गुजरात टायटन्सविरुद्ध डेथ ओव्हर्समध्येही मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली होती. एके काळी असे वाटत होते की मुंबईचे गोलंदाज लखनौला २०० च्या खाली रोखतील, परंतु डेव्हिड मिलर याने शेवटच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारून लखनौला २०० च्या पुढे नेले. हार्दिकने सामन्यात एकूण ५ बळी घेतले.
हार्दिक पांड्याने इतिहास रचला
हार्दिक पांड्याने इतिहास रचला आहे. त्याने त्याच्या १० वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने त्याच्या १४० सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ७२ विकेट्स घेतल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने एडन मार्क्रम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर आणि आकाशदीप यांच्या विकेट घेतल्या. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
पंत-पूरन अयशस्वी
मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरुवात करून दिली. मार्शने ३१ चेंडूत ६० धावा केल्या, ज्यामुळे एलएसजी २३०-२४० धावांचा सहज सामना करू शकेल असे वाटत होते. पण तो आणि एडेन मार्कराम बाद झाल्यानंतर लखनौ संघाचा डाव गडगडला. आयपीएल २०२५ चा ऑरेंज कॅपधारक निकोलस पूरन ६ चेंडूत फक्त १२ धावा काढून बाद झाला. ऋषभ पंतने २ धावा केल्या आणि डेव्हिड मिलर २७ धावा करून बाद झाला.