
नवी दिल्ली ः भारताच्या अविनाश जामवाल याने शानदार कामगिरी करत ब्राझीलच्या फोज दो इगुआचू शहरात सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग कपच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
२२ वर्षीय भारतीय बॉक्सर अविनाश याने मलंगाच्या आवाक्याबाहेर राहण्यासाठी त्याच्या उंचीचा आणि वेगाचा चांगला वापर केला. त्याने ५-० असा एकमताने विजय नोंदवला. पाचपैकी चार न्यायाधीशांनी जामवालला परिपूर्ण ३० गुण दिले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा जामवाल हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी, गुरुवारी, हितेश ७० किलो वजनी गटात फ्रेंच ऑलिम्पियन माकन त्राओरला हरवून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला. अंतिम फेरीत हितेशचा सामना इंग्लंडच्या ओडेल कामाराशी होईल तर जामवालचा सामना स्थानिक खेळाडू युरी रीसशी होईल.
आणखी एक भारतीय बॉक्सर मनीष राठोडची ५५ किलो वजनी गटातील मोहीम उपांत्य फेरीत संपली. तो कझाकस्तानच्या नुरसुल्तान अल्टिनबेककडून ०-५ असा पराभूत झाला.