
चेन्नई सुपर किंग्ज सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत
चेन्नई : आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग तीन सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभूत झाला आहे. चार सामन्यांत चेन्नई संघाचा हा तिसरा पराभव आहे. सीएसके संघाने पराभवाची हॅटट्रीक नोंदवली आहे. त्यामुळे चेन्नई संघ घरच्या मैदानावर तेवढा भक्कम राहिला नाही अशी चर्चा आता होऊ लागली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने २५ धावांनी सामना जिंकून आगेकूच कायम ठेवली.
घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपर किंग्ज हा मोठा दबंग संघ मानला जातो. परंतु, चेन्नईच्या वर्चस्वाला आता सुरुंग लागला आहे. सलग दुसरा सामना चेन्नईने घरच्या मैदानावर गमावला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईसमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई संघ मोठा संघर्ष करताना दिसून आला. विजय शंकर (नाबाद ६९) आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनी (नाबाद ३०) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज झटपट बाद झाले. त्याचा फटका चेन्नई संघाला बसला.
रचिन रवींद्र (३), डेव्हॉन कॉनवे (१३), रुतुराज गायकवाड (५), शिवम दुबे (१८), रवींद्र जडेजा (२) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर चेन्नई संघ विजयाच्या शर्यतीत कधीच दिसून आला नाही. विजय शंकर व धोनी यांनी क्रिकेट चाहत्यांचे थोडे मनोरंजन केले एवढेच. २० षटकात पाच बाद १५८ धावा फटकावत चेन्नई संघ २५ धावांनी पराभूत झाला. विप्रज निगम याने २७ धावांत दोन गडी बाद केले.
केएल राहुलची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने १८३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात केएल राहुलने ५१ चेंडूत ७७ धावा करत दमदार अर्धशतकी खेळी केली. दिल्लीचा सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क पुन्हा एकदा अपयशी ठरला पण अभिषेक पोरेलने त्याच्या ३३ धावांच्या खेळीत अनेक शक्तिशाली फटके मारले. दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दोन विजय मिळवले आहेत, तर चेन्नईने सलग दोन पराभव स्वीकारले आहेत.
चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्कला त्याचे खातेही उघडता आले नाही. केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी सीएसकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्यात ५४ धावांची भागीदारी झाली. पोरेलने २० चेंडूत ३३ धावांची जलद खेळी केली. कर्णधार अक्षर पटेल क्रीजवर होता, पण २१ धावा करून तो बाद झाला.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून केएल राहुल याने डावाची सुरुवात केली. तो शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिला आणि ५१ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या अर्धशतकानंतरही दिल्ली संघ डेथ ओव्हर्समध्ये संघर्ष करताना दिसला.
एकेकाळी दिल्ली संघाने १५ षटकांत १३८ धावा केल्या होत्या. केएल राहुल सेट असल्याने, दिल्लीसाठी २०० धावांचा आकडा पूर्णपणे शक्य दिसत होता. पण शेवटच्या ५ षटकांत दिल्ली संघाला फक्त ४५ धावा करता आल्या आणि ३ मोठ्या विकेटही गमावल्या. शेवटच्या पाच षटकांपैकी फक्त एकाच षटकात दिल्लीचे फलंदाज १० किंवा त्याहून अधिक धावा करू शकले.
सीएसके संघाकडून खलील अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने २ बळी घेतले. तर रवींद्र जडेजा, नूर अहमद आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नूर अहमद अजूनही पर्पल कॅपचा धारक आहे.