
पंजाब किंग्ज संघावर ५० धावांनी विजय, यशस्वी जयस्वाल, जोफ्रा आर्चरची प्रभावी कामगिरी
चंदीगड : चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्ज संघाचा ५० धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला. यशस्वी जयस्वाल आणि जोफ्रा आर्चर यांची कामगिरी सामन्याची दिशा ठरवण्यासाठी निर्णायक ठरली.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान होते. जोफ्रा आर्चर याने पहिल्या षटकात प्रियांश आर्य (०) व कर्णधार श्रेयस अय्यर (१०) यांना बाद करुन पंजाब संघाला दोन मोठे धक्के दिले. प्रियांश पहिल्या चेंडूवर तर अय्यर सहाव्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाले. या दोन मोठ्या धक्क्यातून संघ सावरण्यापूर्वी प्रभसिमरन सिंग (१७), मार्कस स्टोइनिस (१) हे बाद झाले. त्यावेळी पंजाब संघाची स्थिती चार बाद ४३ अशी बिकट झाली होती.
नेहल वधेरा व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने परिस्थितीनुसार फलंदाजी करत सामन्यात थोडी रंगत आणली. खास करुन नेहल वधेरा याने दमदार फलंदाजी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व चार चौकारांसह ६२ धावा फटकावल्या. ग्लेन मॅक्सवेल याने २१ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. या जोडीने ८८ धावांची भागीदारी करुन सामन्यात रोमांच आणला होता. परंतु, हसरंगा याने वधेराला बाद केले सामन्याचे चित्र बदलले. संदीप शर्माने सूर्यांश शेडगे (२) याला स्वस्तात बाद करुन सामन्यातील दुसरा बळी मिळवला. आर्चरने अर्शदीप सिंगला (१) बाद करुन तिसरा बळी मिळवला. पंजाबने २० षटकात नऊ बाद १५५ धावा काढल्या. जोफ्रा आर्चरने २५ धावांत तीन गडी बाद केले. संदीप शर्मा (२-२१) व महेश तीक्षणा (२-२६) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
राजस्थानने २०६ धावांचे लक्ष्य ठेवले
गेल्या काही सामन्यात कमालीचा अपयशी ठरलेल्या यशस्वी जयस्वालच्या धमाकेदार अर्धशतकामुळे राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध चार बाद २०५ धावसंख्या उभारली. मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या हंगामातील १८ व्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकांत चार गडी गमावून २०५ धावा केल्या. पंजाबकडून लॉकी फर्ग्युसनने दोन तर अर्शदीप सिंग आणि मार्को जानसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ८९ धावांची भागीदारी झाली. लॉकी फर्ग्युसनने दोन्ही फलंदाजांचे बळी घेतले. या सामन्यात कर्णधार म्हणून खेळणारा सॅमसन २६ चेंडूत ३८ धावा काढून बाद झाला, तर डावखुरा फलंदाज यशस्वीने तीन चौकार आणि पाच षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १० वे अर्धशतक ४० चेंडूत पूर्ण केले. हे त्याचे सर्वात हळू अर्धशतक देखील आहे. डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध (आयपीएल २०२४) ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. सॅमसन-जैसवाल व्यतिरिक्त, रियान पराग याने नाबाद ४३, नितीश राणा यांनी १२, शिमरॉन हेटमायरने २० आणि ध्रुव जुरेल याने नाबाद १३ धावा केल्या. फर्ग्युसन याने ३७ धावांत दोन गडी बाद केले.