
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित बिली जीन किंग कप आशिया ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू केवळ १५ वर्षे वयाच्या माया राजेश्वरण हिची निवड झाली आहे.
माया राजेश्वरण म्हणाली की, माझ्या भविष्यकालीन योजनांमध्ये २०२५ या वर्षात ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणे आणि त्याबरोबरच महिला ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणे हे माझे प्राथमिक लक्ष्य आहे. त्याबरोबरच येत्या काही वर्षांत ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे हे माझे मध्यावधी लक्ष्य आहे.
नुकत्याच झालेल्या डब्ल्यूटीए मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल बोलताना माया म्हणाली की, वाईल्ड कार्ड द्वारा मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत मिळालेला प्रवेश हा माझ्यासाठी आनंदाचा धक्का होता. खरे म्हणजे यंदाच्या मोसमातील स्पर्धांच्या माझ्या वेळापत्रकात मुंबई ओपन स्पर्धेचा समावेश नव्हता. परंतु एम एसएलटीएचे व सुंदर अय्यर सरानी वाईल्ड कार्ड द्वारे मला ही संधी दिली. त्यामुळे मी अचानक राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आले. त्यामुळे मी त्यांची अत्यंत आभारी आहे. वाईल्ड कार्ड द्वारा प्रवेश मिळाल्यावर ही सुवर्णसंधी असल्याचे मला कळून चुकले. पहिला सामना जिंकल्यावर माझ्या खेळाबद्दल मला आनंद झाला होता. परंतु मी समाधानी नव्हते. कारण ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणे हे माझे खरे लक्ष्य आहे.
मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत प्रवेश मिळाल्यामुळे माया राजेश्वरण हिला जगातील अव्वल खेळाडूंशी खेळण्याची संधी मिळाली. माझ्या कारकिर्दीतील या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात मी ज्युनियर गटातून महिला गटात प्रवेश करत असताना मला मिळालेल्या या संधीमुळे पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी मला मदत होणार आहे. त्यामुळे मला त्याचा विशेष आनंद वाटला.
बिली जीन किंग कप स्पर्धा पुण्यात होत असल्यामुळे मला विशेष आनंद होत असल्याचे सांगून माया म्हणाली की, ही स्पर्धा भारतात आणि पुण्यात होणे हे स्थानिक खेळाडूंसाठी महत्वाचे ठरेल. अखेर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी ज्युनियर स्तरावर भारतासाठी खेळले असले तरी महिला गटासाठी खेळणे हेच मुख्य लक्ष्य होते. आता महिला संघाचा एक भाग असल्याचा मला आनंद वाटत असून ही संधी मला दिल्याबद्दल मी टेनिस संघटनेची आभारी आहे. आम्ही या स्पर्धेत उत्तम कामगिरी असा मला विश्वास वाटतो. पुण्यातील टेनिस प्रेमींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन द्यावे असे मी सर्वांना आवाहन करते. कारण त्यामुळे आमचा खेळ उंचावण्यास निश्चित मदत होणार आहे.