
छत्रपती संभाजीनगर : वाणिज्य पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीला कसे सामोरे जावे आणि बायोडाटा तयार करणे या शीर्षकांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली.
देवगिरी महाविद्यालय एमबीए विभाग प्रमुख डॉ प्रदीप गिऱ्हे आणि कृष्णा नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉ श्रीकांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गात शिकत असलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सदरील कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असून महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करत असते.
प्रमुख वक्ते प्रदीप गिऱ्हे यांनी बायोडाटा तयार करणे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बायोडाटा तयार करताना व मुलाखतीला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी व कशी तयारी करायची यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. बायोडाटा मध्ये नाव, शिक्षण, ईमेल, अद्ययावत लिंकडेन प्रोफाइल, प्राप्त केलेली कौशल्य, हॉबीज, इंटरटर्नशिप, कामाचा अनुभव इत्यादी बाबी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ श्रीकांत थोरात यांनी मुलाखतीला कसे सामोरे जावे या विषयावर मार्गदर्शन करताना आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी, कंपनी आणि भूमिकेचा सराव करून, तुमच्या उत्तरांचा सराव करून आणि सकारात्मक देहबोली आणि संवादावर लक्ष केंद्रित करून कसून तयारी करा. मजबूत छाप पाडण्यासाठी आणि पदासाठी तुमची योग्यता दाखवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. आत्मविश्वासाने मुलाखत कशी द्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुलाखतीला आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे याचे – कंपनी आणि भूमिकेचा अभ्यास करा, तुमच्या उत्तरांचा सराव करा, विचारण्यासाठी प्रश्न तयार करा, तुमची ताकद आणि कमकुवतपणा जाणून घ्या, योग्य पोशाख घाला, चांगली मुद्रा आणि डोळ्यांचा संपर्क ठेवा, हसणे आणि संपर्क साधण्यास सक्षम व्हा, स्पष्टपणे बोला आणि तुमचे विचार व्यक्त करा, प्रामाणिक रहा. तुमच्या ताकदी आणि अनुभवांवर लक्ष केंद्रित करा, यशाची कल्पना करा, तुमचा वेळ घ्या, काळजीपूर्वक ऐका, स्पष्टीकरणासाठी विचारा, सकारात्मक आणि उत्साही रहा, मुलाखतकाराचे आभार माना असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत तंत्रासी अवगत असणे आवश्यक आहे. मुलाखत कर्त्याकडे असलेल्या ज्ञानाची योग्य मांडणी करण्याची कला प्राप्त करण्यासाठी मुलाखतीविषयी मुलाखती दरम्यान कोणती काळजी घ्यावी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी मुलाखत हा नोकरी मिळवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीकडे ज्या पदासाठी त्यांनी अर्ज केला आहे त्या पदाविषयी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य,तसेच त्या पदाची जबाबदारी इत्यादीविषयी त्या विद्यार्थ्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मुलाखतीसाठी योग्य तयारी करून गेल्यास त्याला निश्चितपणे यश प्राप्त होते.
सदरील कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील पदवी आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाचे २६० विद्यार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश लहाने यांनी केले. प्रा स्नेहा अशोक यांनी आभार मानले.