पुणे महिला संघाला विजेतेपद, सायली लोणकर सामनावीर

  • By admin
  • April 6, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन

सातारा ः श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पुणे जिल्हा क्रिकेट संघाने पुनीत बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघावर पाच विकेट राखून विजय संपादन केला. सायली लोणकर हिने सामनावीर किताब संपादन केला.

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात पुनीत बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सर्वबाद १२१ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने १५ षटकात पाच बाद १२५ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला व विजेतेपद पटकावले.

या सामन्यात आयशा शेख हिने २५ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. त्यात तिने आठ चौकार मारले. जीया एस हिने सात चौकारांसह ३२ धावांची वेगवान खेळी केली. अवंती घोलप हिने २५ चेंडूत ३० धावा फटकावल्या. त्यात तिने तीन चौकार मारले. गोलंदाजीत सायली लोणकर हिने १६ धावांत चार विकेट घेत सामनावीर किताब पटकावला. रोहिणी माने हिने २६ धावांत तीन गडी बाद केले. हानी पटेल हिने ११ धावांत एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक ः पुनीत बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी ः २० षटकात सर्वबाद १२१ (यशश्री राजेदेशमुख १२, जीया एस ३२, नीती अग्रवाल ५, सानिका लोकरे ६, चार्मी २१, यशोदा घोगरे ४, अवंती घोलप नाबाद ३०, सायली लोणकर ४-१६, रोहिणी माने ३-२६, हानी पटेल १-११, शलाका काणे १-२७) पराभूत विरुद्ध पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघ ः १५ षटकात पाच बाद १२५ (गौतमी नाईक १७, अस्मी कुलकर्णी ५, अमृता जोसेफ १२, अक्षया जाधव २२, आयशा शेख ४४, सायली लोणकर नाबाद १९, मानसी तिवारी नाबाद ३, तनुजा भोसले १-१४, यशोदा घोगरे १-२८, प्रेरणा सावंत १-२३, यशश्री राजेदेशमुख १-२२). सामनावीर ः सायली लोणकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *