
नाशिक : जागतिक ऑलिम्पिक संघटनेने लॅक्रॉस या खेळाचा समावेश २०२८ मध्ये लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत केला आहे. यामुळे हा खेळ खेळण्यासाठी अनेक खेळाडू इच्छुक झाले आहेत. या खेळाडूंना या खेळाची सखोल माहिती मिळावी यासाठी नाशिक येथे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत.
या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, खेळाडूंना योग्य संधी मिळावी यासाठी लॅक्रॉस असोसिएशन ऑफ नाशिक या संघटनेमार्फत १० एप्रिल रोजी मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, नाशिक येथे सबज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गटाच्या मुला-मुलींची नाशिक जिल्हा संघासाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. सब ज्युनियर गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख ३० एप्रिल २००८, ज्युनियर गटासाठी ३० एप्रिल २००६ किंवा त्यानंतरची असावी.
या निवड चाचणीतून निवड झालेले खेळाडू पुणे येथे १४ आणि १५ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मागील वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये सेलू येथे झालेल्या राज्य लॅक्रॉस स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या पुरुषाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याबद्दल नाशिक पूर्वचे आमदार ॲड राहुल ढिकले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले होते. यावेळी देखील नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व कायम राहावे याकरिता खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यांना सराव करण्यासाठी मैदान आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. संघटनेने नुकतेच या खेळाचे साहित्य खरेदी केले असून खेळाडूंना ते मोफत वापरण्यात दिले जात आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, सरचिटणीस दीपक निकम-पाटील, खजिनदार ज्योती निकम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अविनाश वाघ (७०३०७९६९७६), शैलेश रकीबे (७३९७९७७१७३), शशी भूषणसिंग (८६००२००५५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.