
बंगळुरू ः मी आणि रोहितने भारतासाठी एकत्रित खेळण्याचा आनंद बराच काळ लुटला आहे. आम्ही शेअर केलेल्या सर्व आठवणींसाठी खूप आनंदी व कृतज्ञ आहोत आणि आम्ही असेच करत राहू असे विराट कोहली याने सांगितले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या दशकाहून अधिक काळ भारतीय संघासाठी खेळत आहेत. २०२४ च्या टी २० विश्वचषक विजेतेपदानंतर दोन्ही दिग्गजांनी टी २० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. दोघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्याआधीही त्यांनी भारतीय संघासाठी अनेक संस्मरणीय सामने एकत्र खेळले. आयपीएल २०२५ मध्ये, सोमवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वानखेडेवर सामना होईल तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर येणार आहेत.
रोहित शर्मासोबतच्या नात्याबद्दल विराट कोहली म्हणाला, “आम्हाला भारतासाठी बराच काळ एकत्र खेळण्याचा आनंद मिळाला आहे. आम्ही शेअर केलेल्या सर्व आठवणींसाठी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहोत आणि आम्ही असेच करत राहू. आम्ही संघासाठी नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून खूप जवळून काम केले आहे. नेहमीच कल्पनांवर चर्चा होत असे.”
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ एकाच वेळी पदार्पण केले. रोहितने २००७ मध्ये आणि विराट कोहलीने २००८ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सुमारे १७ वर्षांच्या या प्रवासात दोन्ही क्रिकेटपटूंनी अनेक विक्रम केले आणि मोडले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीपासून (२००८) खेळत आहेत. रोहित शर्मा पूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा आणि नंतर मुंबई इंडियन्समध्ये आला. विराट कोहली पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना ७ एप्रिल रोजी आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.