सीके क्रिकेट अकादमीचा दणदणीत विजय

  • By admin
  • April 6, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

युनिव्हर्सल वन-डे लीग ट्रॉफी ः समर्थ तोतला सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युनिव्हर्सल करंडक वन-डे लीग क्रिकेट स्पर्धेत सीके क्रिकेट अकादमी संघाने संघर्ष क्रिकेट अकादमी संघावर तब्बल १७८ धावांनी विजय संपादन केला. या सामन्यात समर्थ तोतला याने सामनावीर किताब पटकावला.

युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. सीके क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ५० षटकात सर्वबाद २६९ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात संघर्ष क्रिकेट अकादमी संघ २१.२ षटकात अवघ्या ९१ धावांत सर्वबाद झाला. सीके अकादमी संघाने तब्बल १७८ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. 

या सामन्यात समर्थ तोतला याने आक्रमक अर्धशतक साजरे केले. समर्थ याने ६२ चेंडूंचा सामना करत ५० धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने पाच चौकार मारले. किरतराज सिंग याने ५२ चेंडूत ४५ धावांची दमदार खेळी केली. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले. स्पर्श पाटणी याने ३२ चेंडूत आठ चौकारांसह ३९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. गोलंदाजीत समर्थ तोतला याने अवघ्या एक धाव देऊन तीन विकेट घेत सामना गाजवला. या अष्टपैलू कामगिरीमुळे समर्थ तोतला याला सामनावीर किताब प्रदान करण्यात आला. शौर्य मित्तल याने ११ धावांत तीन विकेट घेतल्या. साई याने ३६ धावांत तीन बळी घेतले. 

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

संक्षिप्त धावफलक ः सीके क्रिकेट अकादमी – ५० षटकात सर्वबाद २६९ (स्पर्श पाटणी ३९, लाव्या गोयल ८, समर्थ तोतला ५०, किरतराज सिंग ४५, पर्व पाटणी १२, हर्षित छाजेड ५, कौशल बोदाडे ३१, कार्तिक भारद्वाज नाबाद २४, शौर्य मित्तल २४, इतर २८, साई ३-३६, सोहम सपकाळ २-३८, अयान अन्सारी १-५०, शिवांक जाधव १-३९, सर्वेश १-१०) विजयी विरुद्ध संघर्ष क्रिकेट अकादमी ः २१.२ षटकात सर्वबाद ९१ (राजवर्धन गांगर्डे ५, जीवन काटकर २५, साई ११, प्रेम जमधाडे ८, शलभ ९, इतर २६, समर्थ तोतला ३-१, शौर्य मित्तल ३-११, इशांक काळवणे २-२१, पर्व पाटणी १-१३, कार्तिक भारद्वाज १-८). सामनावीर ः समर्थ तोतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *