
सोलापूर ः छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या एमसीए अंडर १८ दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने सीएनए या बलाढ्य संघावर पहिल्या डावातील आघाडीवर बाजी मारली. सोलापूर संघाचा हा सलग चौथा विजय आहे.

सोलापूर संघाने पहिल्या डावात सात गडी बाद ३६८ धावा केल्या होत्या. कर्णधार आदर्श राठोड याने स्पर्धेतील दुसरे शतक करताना १०६ धावा केल्या आहेत. अर्णव ढोले ७८ धावा, सुमित अहिवळे ७२ धावा, यष्टीरक्षक वीरांश वर्मा नाबाद २८ धावा,
समर्थ कोळेकर २६ धावा यांनी शानदार फलंदाजी केली.
सीएनए संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४८ धावा केल्या. सोलापूर संघाने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात सीएनए संघाने एक गडी बाद ३० धावा केल्या.
सोलापूर संघाकडून अभय लावंड याने पहिल्या डावात तीन बळी घेतले आणि समर्थ दोरनाल याने दोन बळी व श्रीनिवास कुलकर्णी याने दोन बळी घेतले आहेत. तसेच आदर्श राठोड व सुमित अहिवळे यांनी प्रत्येकी एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली.
सोलापूर संघाने पहिल्या डावातील अधिक्यावर तीन गुण प्राप्त करून आगेकूच केली. ८ व ९ एप्रिल रोजी सोलापूर संघाचा शेवटचा सामना छत्रपती संभाजीनगर संघाबरोबर होणार आहे. गुणांच्या तक्त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सतरा गुण घेऊन आघाडीवर आहे. सीएनए संघ १७ गुण घेऊन दुसऱया स्थानावर आहे. सोलापूर संघाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत तरीसुद्धा गुणतक्त्यात सोलापूर संघ १६ गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर संघाबरोबर सोलापूर संघाला विजय प्राप्त करणे गरजेचे आहे.