
गायत्री सुरवसे, सह्याद्री कदम, रोशनी पारधीची लक्षवेधक कामगिरी
अहमदाबाद ः गुजरात क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय महिला अंडर १७ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सौराष्ट्र महिला संघाचा १२३ धावांनी पराभव केला. गायत्री सुरवसे हिने शानदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अहमदाबाद शहरातील गुजरात कॉलेज क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. सौराष्ट्र महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकात सहा बाद १७९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्र महिला संघ २९ षटकात अवघ्या ५६ धावांत गारद झाला. महाराष्ट्र महिला संघाने तब्बल १२३ धावांनी सामना जिंकून आगेकूच कायम ठेवली.
या सामन्यात सह्याद्री कदम हिने अर्धशतक साजरे केले. तिने चार चौकारांसह ७३ चेंडूत ५० धावा फटकावल्या. रोशनी पारधी हिने ४५ चेंडूत आक्रमक ४४ धावांची खेळी साकारली. रोशनी हिने तीन चौकार व एक षटकार मारला. ईश्वरी अवसरे हिने ५३ चेंडूत ३३ धावा फटकावताना पाच चौकार मारले. गोलंदाजीत गायत्री सुरवसे हिने सात धावांत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रोशनी पारधी हिने आठ धावांत दोन गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी बजावली. निकिता सिंग हिने नऊ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र महिला संघ ः ४० षटकात सहा बाद १७९ (ईश्वरी अवसरे ३३, सुहानी कहांडळ १३, भाविका अहिरे ८, सह्याद्री कदम ५०, आमनी नंदाल १५, रोशनी पारधी नाबाद ४४, निकिता सिंग नाबाद ४, राबिया समा २-४७, हर्षिता जडेजा २-२५, अवनी चावडा १-२२) विजयी विरुद्ध सौराष्ट्र महिला संघ ः २९ षटकात सर्वबाद ५६ (क्रिशा हिरपारा २१, अवनी चावडा ९, गायत्री सुरवसे ३-७, रोशनी पारधी २-८, निकिता सिंग २-९, जान्हवी वीरकर १-११, वैष्णवी म्हाळसकर १-२०).