
शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः आकाश बोराडे, मोहम्मद अमन, निखिल जैन सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कॅनेरा बँक, एआयटीजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. आकाश बोराडे, मोहम्मद अमन व निखिल जैन यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गरवारे क्रीडा संकुलावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिला सामना कॅनेरा बँक व बजाज ऑटो या संघा दरम्यान खेळविण्यात आला. कॅनेरा बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बजाज ऑटो संघ प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद ९९ धावा करू शकला. यामध्ये शुभम शिराळे याने २१ चेंडूत ३ चौकारांसह १८ धावा, कर्णधार सागर तळेकर याने १८ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा, अक्षय बांगर याने २४ चेंडूत ११ धावा, अमेय कामठाणकर याने १५ चेंडूत १० धावाचे योगदान दिले. कॅनेरा बँक संघातर्फे गोलंदाजी करताना सुनील भगत याने केवळ १० धावात ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर आकाश बोराडे याने १७ धावात २ गडी तर ऋषिकेश निकम व प्रणित दिक्षित यांनी प्रत्येकी १ एक गडी बाद केला.
कॅनेरा बँक संघाने विजयी लक्ष केवळ ९ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये आकाश बोराडे याने अप्रतिम फलंदाजी करताना केवळ ४० चेंडूत ३ उत्तुंग षटकार व ९ चौकारांसह ६५ धावा व कर्णधार ग्यानोजी गायकवाड याने १९ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावांचे योगदान दिले. बजाज ऑटो संघातर्फे गोलंदाजी करताना जतीन लेखवार याने २५ धावांत ३ गडी बाद केले.

दुसरा सामना एआयटीजी व वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ या संघादरम्यान खेळविण्यात आला. वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद ११९ धावा केल्या. यामध्ये राहुल कायते याने २४ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ३२ धावा, दक्ष काकडे याने ३३ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा, सुरज वाघ याने १८ चेंडूत २ चौकारांसह १७ धावा तर अनिल थोरे याने १० चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १३ धावांचे योगदान दिले. एआयटीजी संघातर्फे गोलंदाजी करताना मोहम्मद अमन याने २३ धावात २ गडी, आदर्श बागवाले याने २८ धावांत २ गडी तर प्रज्वल ठाकरे याने २६ धावांत १ गडी बाद केला तर दोन फलंदाज धावचित झाले.
प्रत्युत्तरात एआयटीजी संघाने विजयी लक्ष १८ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये मोहम्मद अमन याने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ३१ धावा, मोहम्मद आमेर याने २२ चेंडूत ५ चौकारांसह ३७ धावा तर उमर अब्बास याने २२ चेंडूत ४ चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना साई दहाळे याने ९ धावात २ गडी तर अनिल थोरे, सुरज वाघ व राजू कुदळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तिसरा सामना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर व सेंट्रल बँक या संघादरम्यान खेळविण्यात आला. सेंट्रल बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केवळ १५ षटकात सर्वबाद ८९ धावा केल्या. यामध्ये संदीप पाटील याने सर्वाधिक ३१ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ५ चौकारांसह ४१ धावा तर अनिकेत आर्य यांनी २३ चेंडूत १ चौकारासह १४ धावांचे योगदान दिले. तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघातर्फे गोलंदाजी करताना निखिल जैन याने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ १४ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर पियुष दुगड याने १२ धावात २ गडी, निलेश चव्हाण याने १३ धावात २ गडी तर शैलेश घुले व संतोष मारू यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघाने विजयी लक्ष केवळ १३ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये अमोल चौधरी याने ३८ चेंडूत १ षटकार व ५ चौकारांसह ४५ धावा तर हरिओम काळे याने १३ चेंडूत ४ चौकारांसह २० धावांचे योगदान दिले. सेंट्रल बँक संघातर्फे गोलंदाजी करताना विनोद देशमुख, धीरज राजपूत, कर्ण कोळे, तुषार खोब्रागडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यांत पंचाची भूमिका अजय देशपांडे, राजेश सिद्धेश्वर, हसन जमा खान, प्रसाद कुलकर्णी, विशाल चव्हाण, कमलेश यादव यांनी केली. गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
बुधवारी होणारे सामने
बांधकाम विभाग व होमिओपॅथिक डॉक्टर्स (सकाळी ८ वाजता), एआयटीजी व सेंट्रल वर्कशॉप (सकाळी ११ वाजता), ऋचा इंजिनिअरिंग व जिल्हा वकील (दुपारी २ वाजता).