
आरसीबी संघाविरुद्ध सोमवारी मैदानात उतरणार
मुंबई ः आयपीएल स्पर्धेत सध्या खराब कामगिरीतून जात असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबई संघाचा आगामी सामना आरसीबी संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. बुमराहचे पुनरागमन मुंबई संघाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी ठरली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि तो संघाच्या पुढील सामन्यात खेळेल. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बुमराह संघाच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल याची पुष्टी केली.
सोमवारी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२५ च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना आरसीबी संघाशी होईल. सामन्यापूर्वी, फ्रँचायझीने एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्यामध्ये बुमराह बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समधून पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर संघात सामील झाला आहे. बुमराहच्या उपलब्धतेबाबत जयवर्धनेने खुलासा केला की, हा वेगवान गोलंदाज संघाच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल.
सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत जयवर्धने म्हणाले, बुमराह काल रात्रीच येथे पोहोचला. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये त्याचे सत्र पूर्ण केले आणि आमच्या फिजिओच्या देखरेखीखाली आहे, म्हणून त्याने आज गोलंदाजी केली.
२०१३ पासून बुमराह मुंबई इंडियन्ससोबत आहे
२०१३ पासून जसप्रीत बुमराह हा मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचा बलस्थान आहे. तेव्हापासून त्याने मुंबई इंडियन्ससाठी १३३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १६५ विकेट्स घेतल्या आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकला नाही.
सिडनी कसोटीत दुखापत झाली
बुमराहला शेवटची दुखापत या वर्षी ४ जानेवारी रोजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत झाली. त्या दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडला, जो भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. त्याच दुखापतीमुळे बुमराह आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता.
जसप्रीत बुमराहला आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सने १८ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी १ जिंकला आहे आणि मुंबई संघ पॉइंट्स टेबलमध्ये ७ व्या स्थानावर आहे.