
गुरुकुल आंतर अकादमी क्रिकेट ः शुभंकर काळे, रबमीत सिंग सोधी, राजवीर देवकरची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल यलो आर्मी संघाने रोमांचक सामना दोन विकेट राखून जिंकत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात शुभंकर काळे याने शानदार कामगिरी बजावत सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गुरुकुल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक श्रेयस मगर यांनी या स्पर्धेचे आयोजन डी वाय पाटील क्रिकेट मैदानावर केले होते. अंतिम सामन्यात गुरुकुल यलो आर्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरुकुल जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात आठ बाद १७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. गुरुकुल यलो आर्मी संघाने २३.२ षटकात आठ बाद १७९ धावा फटकावत अटीतटीचा हा सामना दोन विकेट राखून जिंकला आणि विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात रबमीत सिंग सोधी याने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. रबमीत याने अवघ्या २८ चेंडूत ८० धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल नऊ षटकार व पाच चौकार मारले. कार्तिक गेहलोत याने ५५ चेंडूत ५३ धावांची वेगवान अर्धशतकी खेळी केली. त्याने नऊ चौकार मारले. राजवीर देवकर याने वादळी फलंदाजी केली. राजवीर याने अवघ्या १३ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. त्याने तब्बल सात उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. रबमीत व राजवीर यांनी षटकारांचा पाऊस पाडत मैदान गाजवले.
गोलंदाजीत रबमीत सिंग सोधी याने ५२ धावांत तीन विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. शुभंकर काळे याने ११ धावांत दोन गडी बाद केले. एजी याने २१ धावांत दोन बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल जायंट्स ः २५ षटकात आठ बाद १७८ (आरव लोढा १४, रेयांश बाफना ४, शौर्य अग्रवाल ९, लोवेश जैस्वाल २१, तस्त्या पटेल ६, रबमीत सिंग सोधी ८०, आयुष बुगडे १४, श्रीराज नाबाद ६, इतर २१, शुभंकर काळे २-११, एजी २-२१, आदित्य बागुल १-१४, अर्चित देशमुख १-५७) पराभूत विरुद्ध गुरुकुल यलो आर्मी ः २३.२ षटकात आठ बाद १७९ (कार्तिक गेहलोत ५३, स्वराज तासरे १६, रेयांश अडचित्रे ६, जयंत पांडे १३, राजवीर देवकर ५१, सार्थ सुभेदार नाबाद २१, विवेक गुरनानी नाबाद ६, इतर ११, रबमीत सिंग सोधी ३-५२, शौर्य अग्रवाल १-११, जयेश कावळे १-०, अर्जुन जोशी १-८, लोवेश जैस्वाल १-१८, साद शेख १-८). सामनावीर ः शुभंकर काळे.