
पुणे : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेली बिली जीन किंग चषक २०२५ टेनिस स्पर्धा ही भारतामधील युवा खेळाडूंना उच्च दर्जाचा अनुभव मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे भारताची अव्वल मानांकित खेळाडू अंकिता रैना हिने सांगितले.
आशिया-ओशनिया ग्रुप १ सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अतिशय अनुभवी अंकिता रैना करणार आहे. भारतासोबत, चीन तैपेई, हाँगकाँग चीन, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि थायलंडचे संघ या स्पर्धेमध्ये मध्ये सहभागी होतील.
घरच्या मैदानावर खेळण्याबद्दल अंकिता म्हणाली, “हे सामने पुण्यात होत आहेत याबद्दल मी खूप उत्साहित आहे आणि भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी १० वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाकडून खेळत आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच माझे स्वप्न होते आणि ते साध्य केल्याबद्दल मी भाग्यवान आहे.”
“ही स्पर्धा सर्वोच्च स्तरावर आयोजित केली जाते आणि भारतात ही स्पर्धा होणे हा एक मोठा फायदा आहे कारण युवा खेळाडूंना अनेक मानांकित खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा भारतात आणल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे अभिनंदन करू इच्छितो. येथे जितके उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय टेनिस येईल तितके ते खेळासाठी चांगले आहे,” असेही अंकिताने सांगितले.
अंकिता हिच्या बरोबर सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली भामिदीप्ती, वैदेही चौधरी आणि प्रार्थना ठोंबरे यांचा भारतीय संघात समावेश आहे. तसेच या संघामध्ये किशोरवयीन सेन्सेशन माया राजेश्वरनची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
अंकिता पुढे म्हणाली की, “आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना, प्रत्येकजण खेळाच्या मैदानावर नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करतो. आणि आपण सर्वजण ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही भारतीय संघासोबत स्पर्धांसाठी प्रवास करता तेव्हा तो एक पूर्णपणे वेगळा अनुभव असतो आणि मला खात्री आहे की तो आम्हाला एक संघ म्हणून चांगले कौशल्य दाखविण्यास मदत करेल.”
अशा महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. याबद्दल विचारले असता, अंकिताने तिच्या जीवनात ध्यानाचे महत्त्व सांगितले. ती म्हणाली, “मी १८ किंवा २० वर्षांची असताना ध्यानधारणाची ओळख झाली आणि त्यामुळे ज्युनियर पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत संक्रमण होण्यास निश्चितच मदत झाली, कारण तेव्हा तुम्हाला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागते. तुम्ही अधिक अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळत आहात आणि कठीण परिस्थितींना तोंड देत आहात आणि सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी काय करता येईल हे देखील शिकले आहे. म्हणून, मला वाटते की ध्यानधारणामुळे मला शांत राहण्यास मदत केली आहे.”
भारताला या स्पर्धेत आव्हानात्मक सामने खेळावे लागणार आहेत. दिग्गज सानिया मिर्झाकडून प्रेरणा घेतलेली अंकिता म्हणाली की ‘कोणालाही हलके घेता येणार नाही. येथे आलेले सर्व खेळाडू खूप चांगले खेळाडू आहेत आणि कोणीही आम्हाला सहजासहजी विजय मिळवून देणारा नाही. गेल्या वर्षी, मी न्यूझीलंडच्या लुलू सन या खेळाडूविरुद्ध खेळले होते. लुलू हिने विम्बल्डनमध्ये पात्रता फेरी मधून सातत्यपूर्ण कामगिरी करीत मुख्य फेरीत प्रवेश मिळविला होता. नंतर तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच खेळाडू अतिशय उच्च दर्जाचे आहेत.”