
हैदराबाद संघाचा पराभवाचा चौकार; शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदरची धमाकेदार फलंदाजी
हैदराबाद : कर्णधार शुभमन गिल (नाबाद ६१), वॉशिंग्टन सुंदर (४९) आणि मोहम्मद सिराज (४-१७) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला. गुजरात संघाचा हा सलग तिसरा विजय आहे तर हैदराबाद संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. गुजरात संघाने विजयाची हॅटट्रिक साजरी केली तर हैदराबाद संघाने पराभवाचा चौकार मारला आहे.
गुजरात संघासमोर विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य होते. गुजरात संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. साई सुदर्शन (५) व जोस बटलर (०) यांना शमी व कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी स्वस्तात बाद करून सामन्यात थोडी रंगत आणली. परंतु, कर्णधार शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करुन हैदराबाद संघाचा पराभव निश्चित केला. सुंदरची आक्रमक ४९ धावांची खेळी शमीने संपुष्टात आणली. सुंदर याने आपल्या स्फोटक खेळीत २९ चेंडूंचा सामना केला आणि त्यात पाच चौकार व दोन षटकार मारले.

सुंदर समवेत शानदार फलंदाजी करत शुभमन गिल याने दमदार अर्धशतक साजरे केले. गिल याने ४३ चेंडूंत नाबाद ६१ धावा फटकावत संघाला मोठा विजय मिळवून दिला. गिलने नऊ खणखणीत चौकार मारले. शेरफेन रदरफोर्ड याने देखील धमाकेदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या १६ चेंडूत नाबाद ३५ धावा फटकावत विजय सोपा बनवला. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. गुजरात संघाने १६.४ षटकात तीन बाद १५३ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. शमी याने २८ धावांत दोन विकेट घेतल्या. कमिन्सने २६ धावांत एक बळी मिळवला.
धावांसाठी हैदराबादचा संघर्ष
पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ गेल्या तीन सामन्यांत धावांचा दुष्काळ अनुभवत आहे. गुजरात जायंट्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने १५२ धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर फलंदाजी करण्यात मोठा संघर्ष करावा लागला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता आले नाही. या संथ खेळपट्टीवर हैदराबाद संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज नितीश कुमार रेड्डी होता, ज्याने ३१ धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराज याने घातक गोलंदाजी केली.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची रणनीती चांगली ठरली कारण ट्रॅव्हिस हेड फक्त ८ धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा १८ धावा काढून बाद झाला आणि इशान किशन १७ धावा काढून बाद झाला. हैदराबाद संघाचे तिन्ही टॉप ऑर्डर फलंदाज ५० धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
नितीश रेड्डी-हेनरिक क्लासेन जोडीने डाव सावरला
सनरायझर्स हैदराबाद संघ अडचणीत होता, त्यावेळी नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी ५० धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी केली. नितीशने ३१ धावा आणि क्लासेनने २७ धावा केल्या. एकेकाळी हैदराबादने १५ षटकांत १०५ धावा केल्या होत्या आणि संघाकडे ६ विकेट शिल्लक होत्या. पण शेवटच्या ५ षटकांत हैदराबाद संघाने ४ विकेट गमावल्या आणि ४७ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये, कर्णधार पॅट कमिन्सने ९ चेंडूत २२ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली आणि हैदराबादची धावसंख्या १५० च्या पुढे नेली.
मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी
मोहम्मद सिराजने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात ५४ धावा दिल्या होत्या, परंतु पुढील ३ सामन्यांमध्ये सिराजने ९ विकेट घेतल्या आहेत. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत फक्त १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंग यांना पॅव्हेलियन मध्ये पाठवले.