
सोलापूर : ॲड कोमलताई अजय साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने गुरुवारी (१० एप्रिल) सकाळी १० वाजता बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जुळे सोलापूर येथे खुल्या तसेच ९ व ७ वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ८ फेऱ्यात संपन्न होणार आहे. खेळाडूंना प्रत्येकी १५ मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी २१०० रुपये, १५००, १०००, ८००, ६००, ५००, ४००, ३००, २०० अशी पंधरा तसेच तसेच खुल्या गटात १६, १३, ११ व सर्वोत्तम मुली या विविध गटात प्रत्येकी दहा आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. एकूण रोख पारितोषिकांसह १०० बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
७ व ९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील प्रथम येणाऱ्या दोन खेळाडूंची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी १ हजार रुपये राज्य स्पर्धा खेळून आल्यानंतर देण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एकूण ४५ हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे, आकर्षक ‘चेक अँड मेट चषक’ व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे आधारस्तंभ डॉ लक्ष्मणराव ढोबळे व प्राचार्य डॉ वासंती पांढरे यांनी दिली.
इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे (८८८८०४५३४४) व प्रशांत पिसे (९१५६८१५९६३) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सचिव सुमुख गायकवाड यांनी केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.