
सरस्वती भुवन संस्थेत क्रीडा शिक्षक कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : खेळाडूंच्या क्रीडा प्रज्ञा शोध घेऊन, त्यांचा गुणवत्ता विकास शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देऊन व्हावा, असे प्रतिपादन सरस्वती भुवनचे सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
डॉ श्रीरंग देशपांडे म्हणाले की, ‘हा उद्देश ठेवून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांनी मैदानावर खेळाडू घडविण्याचे काम प्राधान्याने करून देशासाठी खेळाडू घडवावेत.’

सोमवारी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय पटांगणावर संस्थेच्या अकॅडमी ऑफ फिजिकल एक्सलन्स अंतर्गत संस्थेच्या सर्व महाविद्यालय व प्रशालेतील सर्व क्रीडा शिक्षक, प्राध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचा उद्देश खेळाडूंची शारीरिक क्षमता, तंदुरूस्ती, खेळनिहाय निवड करणे, प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे व तो सुयोग्यरित्या राबविणे असा होता.
समारोप प्रसंगी सरस्वती भुवनचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील यांनी क्रीडा शिक्षकांनी नावीन्याचा ध्यास घेऊन नवनवीन खेळाचे कौशल्य आत्मसात करावे, यामुळे खेळाडूंना ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील असे प्रतिपादन केले.
सरस्वती भुवनचे सहचिटणीस डॉ सुनील देशपांडे यांनी प्रशिक्षकांनी स्वतःच्या फिटनेसवर भर द्यावा व वेळप्रसंगी क्रीडा कौशल्य स्वतः सादर करून दाखवावीत, असे मत व्यक्त केले.
प्रथम सत्रातील कार्यशाळेची सुरूवात करताना डॉ विशाल देशपांडे यांनी वॉर्मिंग अपचे महत्त्व याबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. डॉ पूनम राठोड यांनी खेळ झाल्यावर शिथलीकरणाचे व्यायामाचे महत्त्व प्रात्यक्षिक द्वारे समजावून सांगितले.
द्वितीय सत्रात धावणे, गोळाफेक व लांबउडी यासाठी खेळाडूंची निवड कशी करावी व त्यांना प्रशिक्षण कसे द्यावे याबाबत डॉ दयानंद कांबळे यांनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत संस्थेतील सर्व शाळा, महाविद्यालयातील एकूण २४ क्रीडा शिक्षक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. शेवटी सहभागी सर्व क्रीडा शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील व सहचिटणीस डॉ सुनील देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.