
मुंबई इंडियन्स रोमांचक सामन्यात १२ धावांनी पराभूत, पाच सामन्यात चौथा पराभव
मुंबई : तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांच्या धमाकेदार फलंदाजीनंतरही मुंबई इंडियन्स संघाची पराभवाची मालिका काही खंडीत होऊ शकली नाही. आरसीबी संघाने रंगतदार सामना १२ धावांनी जिंकला. पाच सामन्यात मुंबई संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे आरसीबी संघाने चार लढतीत तिसरा विजय साकारत पदक तालिकेत आपले स्थान भक्कम केले. तब्बल १० वर्षांनी आरसीबी संघाने वानखेडे स्टेडियमवर मुंबईला हरवले हे विशेष.
मुंबई इंडियन्स संघासाठी मैदान घरचे आहे की बाहेरचे. त्यामुळे मुंबईच्या निकालात फार फरक पडताना दिसत नाहीए. मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २२२ धावांचे मोठे आव्हान होते. रोहित शर्मा (१७) व रायन रिकेलटन (१७) या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. परंतु, ही सलामी जोडी आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात विल जॅक्स २२ धावांवर सीमारेषेवर झेलबाद झाला. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने सोपा झेल घेतला. त्यावेळी मुंबईची स्थिती ३ बाद ७९ अशी बिकट होती.

त्यानंतर सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा जोडीकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा होत्या. यश दयाल याने डावातील १२व्या षटकात सूर्यकुमारला २८ धावांवर बाद करुन मुंबईला मोठा धक्का दिला. खरे तर या षटकात दुसऱ्या चेंडूवर सूर्याला जीवदान लाभले होते. परंतु, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्याने आपली विकेट गमावली. त्याने २६ चेंडूंचा सामना करत पाच चौकार मारले.
तिलक वर्मा व हार्दिक पंड्या या जोडीने धमाकेदार फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. तिलक वर्मा याने २९ चेंडूत ५६ धावांची वादळी खेळी केली. त्याने चार षटकार व चार चौकार मारले. भुवनेश्वरने तिलक वर्माला बाद करुन मोठा धक्का दिला. या जोडीने ८९ धावांची भागीदारी करुन सामन्यात रंगत आणली. हेझलवूड याने हार्दिकची आक्रमक खेळी ४२ धावांवर संपुष्टात आणली. त्याने १५ चेंडूत तीन चौकार व चार षटकार ठोकले. हार्दिकच्या आक्रमक फटकेबाजीने सामन्यात रोमांच निर्माण झाला होता. हार्दिक बाद झाला आणि सामना आरसीबी संघाकडे झुकला. त्यानंतर तळाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. कृणाल पंड्याने शेवटच्या षटकात तीन विकेट घेऊन संघाचा विजय निश्चित केला. कृणालने ४५ धावांत चार गडी बाद केले. यश दयाल (२-४६) व जोश हेझलवूड (२-३७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. २० षटकात मुंबईने ९ बाद २०९ धावा काढल्या.
आरसीबी संघाची धमाकेदार फलंदाजी
आयपीएलच्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम खेळताना धमाकेदार फलंदाजी करुन २० षटकांत ५ गडी गमावून २२१ धावा केल्या. वानखेडे मैदानावर आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. आरसीबी संघाकडून विराट कोहलीने ४२ चेंडूत आक्रमक ६७ धावा, देवदत्त पडिक्कलने २२ चेंडूत ३७ धावा आणि कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत ६४ धावा केल्या. शेवटी जितेश शर्मा यानेही दमदार फलंदाजी केली. १९ चेंडूत ४० धावा काढून जितेश नाबाद परतला. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर फिल सॉल्ट बोल्ड झाला. त्याला ट्रेंट बोल्ट याने बाद केले. त्यानंतर देवदत्त पडिकलने जबाबदारी घेतली आणि मोकळेपणाने शॉट्स खेळले.
विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी ६ षटकांत १ बाद ७३ धावा केल्या. २२ चेंडूत ३७ धावा करून पडिकल बाद झाला. त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार लागले. त्यानंतर विराट आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी जबाबदारी स्वीकारली. ४२ चेंडूत ६७ धावा करून विराट बाद झाला. त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन खाते न उघडता तंबूत परतला.
१४४ धावांत ४ विकेट गमावल्यानंतर जितेश शर्मा आणि रजत पाटीदार यांनी मुंबईच्या गोलंदाजांना फटकारले. पाटीदारने ३२ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ४ षटकार लागले. शेवटी जितेश शर्माने स्फोटक फलंदाजी केली. जितेश १९ चेंडूत नाबाद ४० धावा काढून परतला. त्याने चार षटकार व दोन चौकार लगावले.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ४ षटकांत ४५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. हार्दिकने टी २० मध्ये २०० विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. त्याच्याकडे आता आयपीएल २०२५ मध्ये १० विकेट्स आहेत. पर्पल कॅप होल्डर नूर अहमदकडेही १० विकेट्स आहेत. जसप्रीत बुमराहने ४ षटकांत २९ धावा दिल्या. त्याला कोणतेही यश मिळाले नाही. ट्रेंट बोल्टनेही दोन विकेट्स घेतल्या, पण त्याने ४ षटकांत ५७ धावा दिल्या. दुखापतीतून सावरलेल्या बुमराहच्या पुनरागमनकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने षटकार ठोकून बुमराहचे स्वागत केले.