
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने डॉ साद सिद्दीकी यांचे “मानव संसाधन क्षेत्रातील नव-कलाटणी व नवीन भरती होणाऱ्या उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा” या विषयावर अतिथी व्याख्यान झाले.
देवगिरी महाविद्यालय येथील एमबीए विभागाच्या वतीने नुकतेच डॉ साद सिद्दीकी यांचे “मानव संसाधन क्षेत्रातील नव-कलाटणी व नवीन भरती होणाऱ्या उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानात त्यांनी एचआर क्षेत्रातील सध्याचे बदल, कंपन्यांची नवीन धोरणे, उद्योगक्षेत्रातील गरजा, आणि नवीन उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षांवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास, आणि सॉफ्ट स्किल्सच्या महत्त्वावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ सिद्दीकी यांनी त्यांच्या व्याख्यानातून उद्योगातील वास्तव परिस्थिती, नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, आणि एचआर क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला.
या व्याख्यानाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, एमबीए विभागाच्या समन्वयक प्रा सबिहा शेख, विभागप्रमुख प्रा प्रदीप गिऱ्हे, तसेच विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वर्षा करडखेडकर यांनी केले. शुभम पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ प्रद्युम्न शास्त्री यांनी आभार मानले.
या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील एचआर संबंधित ज्ञान व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास व भविष्याच्या तयारीला अधिक बळकटी मिळाली.