
थायलंड येथे समुद्री जलतरण स्पर्धेत सहभाग
छत्रपती संभाजीनगर ः थायलंड क्राबी येथील वारणा बीचवर नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धेत ओशनमॅन १० किमी अंतराच्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमजीएम विद्यापीठातील क्रीडा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्रीनिवास मोतीयेळे, मनपा सिद्धार्थ जलतरण तलावाचे प्रशिक्षक अजय दाभाडे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओपन वॉटर प्रमुख किशोर राऊत यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत तुर्की, कॅनडा, रशिया, जपान, चीन, इंडोनेशिया, कजाकिस्तान, थायलंड, भारत यासह आदी देशातील हजारो जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दोन दिवस आधी थायलंड मध्ये झालेल्या भूकंपाचा परिणाम समुद्री लाटांवर होता. त्यामुळे निर्धारित अंतर यशस्वीपणे पार करणे कठीण होते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिग्गज खेळाडूंनी प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर ही स्पर्धा पूर्ण करीत ओशनमॅन किताब मिळविला.
जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अभय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. परदेशातील समुद्रकिनाऱ्यावर भारतीय तिरंगा फडकावत जिल्ह्याचा नावलौकिक केल्याबद्दल रुस्तुम तुपे, अशोक काळे, संदीप चव्हाण, प्रदीप बुरांडे, रवींद्र राठी, एकनाथ शेळके, निखिल पवार, विष्णू राकडे, गोपीनाथ खरात, संजय गोमलाडू, मधुकर राशीनकर, मनोज जाधव, प्रशांत खेडकर सर्व क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.