
सोलापूर संघावर १४४ धावांची आघाडी, जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, राम राठोड चमकले
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ दोन दिवसीय निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या दिवशी नऊ बाद २५२ धावसंख्या उभारुन सोलापूर संघाविरुद्ध पहिल्या डावात १४४ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना होत आहे. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवताना सोलापूर संघाचा पहिला डाव ३५.३ षटकात अवघ्या १०८ धावांवर रोखला. विरांश याने सर्वाधिक २४ धावा काढल्या. अर्णव ढोले (२१), सुमित अहिवळे (१७), समर्थ दोरनल (१०), अथर्व जगताप (१०) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला.
छत्रपती संभाजीनगर संघाच्या श्रीनिवास लेहेकर याने २५ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने ८ धावांत दोन गडी बाद करुन सुरेख गोलंदाजी केली. जय हारदे याने २३ धावांत दोन बळी घेतले. सुमित सोळुंके (१-१९), अभिराम गोसावी (१-१४) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सोलापूर संघाला १०८ धावांवर रोखल्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ४४.४ षटकांचा सामना करत नऊ बाद २५२ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे.
रुद्राक्ष बोडके व राम ऱाठोड या सलामी जोडीने ८४ धावांची भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. राम राठोड याने ५१ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने नऊ चौकार व एक षटकार मारला. रुद्राक्ष बोडके याने ४६ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले.
मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज जय हारदे याने ४७ चेंडूत ८४ धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. त्याने आपल्या धमाकेदार खेळीत तब्बल ८ षटकार व पाच चौकार मारले. जय हारदे याच्या दमदार फलंदाजीने संघाला मोठी आघाडी घेण्यात यश मिळाले.
वीर राठोड (९), राघव नाईक (७), कृष्णा खवळ (८), श्रीवत्स कुलकर्णी (१), श्रीनिवास लेहेकर (२६), सुमित सोळुंके (२) व अभिराम गोसावी (नाबाद २) यांनी आपले योगदान दिले.
सोलापूर संघाकडून समर्थ दोरनळ याने ५१ धावांत चार विकेट घेतल्या. अभय लावंड याने ४९ धावांत दोन गडी बाद केले. आदर्श राठोड (१-२८), श्रीनिवास कुलकर्णी (१-४१), सुमित अहिवळे (१-१८) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.