
राज्यातील नामांकित महिला खेळाडूंचा सहभाग, संयोजक अजय भवलकर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यातील महिला क्रिकेट क्षेत्राला एक नवा आयाम देत छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या १५ ते २० एप्रिल दरम्यान जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रंगणार आहे. मराठवाड्यात प्रथमच महिलांसाठी अशा स्वरूपाची प्रीमियर लीग आयोजित करण्यात येत आहे असे अजय भवलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या स्पर्धेची माहिती स्पर्धा आयोजक अजय भवलकर यांनी सविस्तरपणे दिली. या प्रसंगी अमित भोसेकर, किशोर निकम, दीपक पाटील, प्रियंका गारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यातील कौशल्यांना योग्य दिशा देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे अजय भवलकर यांनी सांगितले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक देविका पळशीकर तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते होणार आहे. समारोप समारंभास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी २३ मार्च २०२५ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, स्पर्धेत मणी मंत्रा, आरएसआय क्यिन, पीएसबीए, मंगल दीप, ओरियन सिटी केयर, प्रेमा प्लॅटिनम आदी सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे कर्णधार हे राज्यस्तरीय खेळाडू असणार आहेत. महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सहा आघाडीच्या महिला क्रिकेटपटूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्पर्धेचे दर्जा आणखी उंचावणार आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने २० षटकांचे (टी २० फॉरमॅट) असणार असून दररोज दोन सामने खेळवले जातील. पाच दिवस क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महिला क्रिकेटला नवीन दिशा मिळणार असून, छत्रपती संभाजीनगर हे महिला क्रिकेटच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.