
एमसीए अंडर १९ क्रिकेट ः जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, राम राठोडची दमदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ निमंत्रित दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने सोलापूर संघाचा दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या विजयामुळे छत्रपती संभाजीनगर संघाने आपल्या गटात २४ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आहे.
रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी सोलापूर संघाला पहिल्या डावात अवघ्या १०८ धावांत रोखून योग्य ठरवला. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सर्वबाद २५६ धावसंख्या उभारुन पहिल्या डावात १४८ अशी भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर सोलापूर संघ दुसऱया डावात १६५ धावांत सर्वबाद झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने अवघ्या १.३ षटकात बिनबाद १८ धावा फटकावत दहा विकेटने दणदणीत विजय साकारला.
या सामन्यात जय हारदे याने ४७ चेंडूंचा सामना कर त ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. जय याने पाच चौकार आणि तब्बल आठ षटकार ठोकत मैदान गाजवले. राम राठोड याने ५१ चेंडूत ५० धावांची जलद खेळी केली. रामने ९ चौकार व एक षटकार मारला. अथर्व जगताप याने ३४ चेंडूत ४६ धावांचे योगदान दिले. त्याने ११ चौकार मारले. गोलंदाजीत श्रीनिवास लेहेकर याने २५ धावांत चार विकेट घेतल्या. समर्थ दोरनळ याने ५१ धावांत चार गडी बाद केले. जय हारदे याने ३१ धावांत तीन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. श्रीनिवास लेहेकर हा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
सुपर लीगसाठी पात्र
छत्रपती संभाजीनगर संघाने साखळी स्पर्धेत पाचपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवला. एक सामना गमावला तर एक सामना अनिर्णित राहिला. यात संघातील सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर संघ २४ गुणांसह गटात अव्वल ठरला आहे. येत्या १४ एप्रिलपासून सुरू होणाऱया सुपर लीग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर संघ पात्र ठरला आहे. या शानदार कामगिरीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या संघाला प्रशिक्षक अनंत नेरळकर, अतुल वालेकर व संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कोट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या १९ क्रिकेट संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी दाखवली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर संघातील सर्वच खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे शानदार खेळ केला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू हा मिळालेल्या संधीचे सोने करताना दिसत आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. खास करुन कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याची कामगिरी खास ठरली आहे. या स्पर्धेत श्रीवत्स कुलकर्णी याने सर्वाधिक धावा व विकेट घेतल्या आहेत. आपल्या संघाला एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. सुपर लीग स्पर्धेतही छत्रपती संभाजीनगर संघ आपली कामगिरी उंचावेल याची खात्री आहे.
- सचिन मुळे, सचिव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटना.
संक्षिप्त धावफलक ः सोलापूर ः पहिला डाव ः ३५.३ षटकात सर्वबाद १०८ (सुमित अहविळे १७, अर्णव ढोले २१, विरांश २४, श्रीनिवास लेहेकर ४-२५, जय हारदे २-२३, श्रीवत्स कुलकर्णी २-८, सुमित सोळुंके १-१९, अभिराम गोसावी १-१४).
छत्रपती संभाजीनगर ः पहिला डाव ः ४६.१ षटकात सर्वबाद २५६ (रुद्राक्ष बोडके ३५, राम राठोड ५०, जय हारदे ८४, वीर राठोड ९, राघव नाईक ७, कृष्णा खवळ ८, श्रीनिवास लेहेकर २६, इतर २८, समर्थ दोरनळ ४-५१, अभय लवांड २-४९, श्रीनिवास कुलकर्णी २-४५, आदर्श राठोड १-२८, सुमित अहिवळे १-१८).
सोलापूर ः दुसरा डाव ः ३७.४ षटकात सर्वबाद १६५ (सुमित अहिवळे २६, आदर्श राठोड १८, श्रीनिवास कुलकर्णी १५, समर्थ दोरनळ १७, अर्णव ढोले १३, समर्थ कोळेकर ११, अथर्व जगताप ४६, श्रीनिवास लेहेकर ३-५४, जय हारदे ३-३१, जैद पटेल २-४, श्रीवत्स कुलकर्णी २-३४).
छत्रपती संभाजीनगर ः दुसरा डाव ः १.३ षटकात बिनबाद १८ (राम राठोड नाबाद १४).