
गिरीश गाडेकर, मोहम्मद आमेर, निखिल सांगळे सामनावीर, आमेर-अब्बासची २२१ धावांची विक्रमी भागीदारी

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत होमिओपॅथिक डॉक्टर इलेव्हन, एआयटीजी आणि रुचा इंजिनिअरिंग या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. गिरीश गाडेकर, मोहम्मद आमेर व निखिल सांगळे यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म्स प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३२व्या शहीद भगतसिंह क्रिकेट सामन्यांमध्ये बुधवारी खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्याच्या पहिल्या झालेल्या सामन्यात होमिओपॅथिक डॉक्टर संघाने बांधकाम विभाग संघावर ११२ धावांनी मोठा विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात एआयटीजी संघाने एसटी सेंट्रल वर्कशॉप संघावर १७९ धावांनी दणदणीत विजय साकारला. तिसऱ्या सामन्यात रुचा इंजिनिअरिंग संघाने जिल्हा वकील युनायटेड संघावर पाच गडी राखून विजय संपादन केला.

पहिला सामना होमिओपॅथिक डॉक्टर्स व बांधकाम विभाग या संघांदरम्यान खेळविण्यात आला. बांधकाम विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. होमिओपॅथिक डॉक्टर संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १८८ धावसंख्या उभारली. त्यामध्ये कर्णधार गिरीष गाडेकर याने अप्रतिम खेळी करताना ४२ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ७ चौकारांसह ५३ धावा फटकावल्या. तसेच ज्ञानेश्वर बनकर याने १७ चेंडूत २२ धावा, सुनील काळे याने १८ चेंडूत ३ चौकारांसह १९ धावा, कार्तिक बाकलीवाल याने ९चेंडूत २ षटकार व १ चौकारासह १८ धावा तर राजेंद्र चोपडा व रबमितसिंह सौदी यांनी प्रत्येकी १५ धावांचे योगदान दिले.
बांधकाम विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना राहुल सोनवणे याने २९ धावात ३ गडी बाद केले. तर नीरज देशपांडे, शैलेश सूर्यवंशी व कर्णधार रवींद्र तोंडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात बांधकाम विभाग संघ १५ षटकात सर्वबाद ७६ धावाच करू शकला. यामध्ये प्रवीण गवळी याने २४ चेंडूत दोन षटकार व तीन चौकारांसह ३८ धावा केल्या. योगीराज चव्हाण याने ११ चेंडूत दहा धावांचे योगदान दिले तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.
होमिओपॅथिक डॉक्टर संघातर्फे गोलंदाजी करताना राजेंद्र चोपडा, महेश दसपुते, विनोद यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर मयूर राजपूत व लक्ष्मण सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
एआयटीजी संघाचा धावांचा डोंगर
दुसरा सामना एस टी सेन्ट्रल वर्कशॉप व एआयटीजी या संघांदरम्यान खेळवण्यात आला. एआयटीजी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १ बाद २५९ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये मोहम्मद आमेर याने अप्रतिम खेळी करताना केवळ ६८ चेंडूत २ उत्तुंग षटकार व २० चौकारांसह नाबाद १४० धावांची खेळी केली. त्याला साथ देत ओमर अब्बास याने ४३ चेंडूत १ उत्तुंग षटकार व ११ चौकारांसह ७५ धावा तर आदर्श बागवाले यांनी ९ चेंडूत २ षटकार व १ चौकारासह नाबाद २१ धावांचे योगदान दिले. एसटी सेंट्रल वर्कशॉप संघातर्फे गोलंदाजी करताना संतोष सातरे यांनी केवळ एक मात्र गडी बाद केला. तर बाकीचे सर्व गोलंदाज बळी घेण्यास अपयशी ठरले,
प्रत्युत्तरात एसटी सेंट्रल वर्कशॉप संघ १७ षटकात सर्वबाद ८० धावाच करू शकला यामध्ये राजरत्न सोनकांबळे याने ३३ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ३८ धावा, साहेबराव जगताप याने २० चेंडूत ११ धावा तर संतोष तळेकर याने १३ चेंडूत २ चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. एआयटीजी संघातर्फे गोलंदाजी करताना आदर्श बागवाले याने १२ धावात ३ गडी तर वसीम मस्तान, मोहम्मद आमेर व ऋषिकेश बिरोटे यांनी प्रत्येकी २ गडी तर प्रज्वल ठाकरे याने ११ धावात १ गडी बाद केला.
तिसरा सामना जिल्हा वकील युनायटेड व ऋचा इंजिनिअरिंग या संघादरम्यान खेळविण्यात आला. जिल्हा वकील युनायटेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १४० धावा केल्या. यामध्ये साईसागर अंबिलवडे याने ३७ चेंडूत ९ चौकारांसह ५७ धावा, ओमकार कर्डिले याने ३९ चेंडूत ४ चौकारांसह ३६ धावा तर विजय आहेर याने २३ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले.
रुचा इंजिनिअरिंग संघातर्फे गोलंदाजी करताना निखिल सांगळे याने १५ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर अमर यादव याने २० धावात २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात रुचा इंजिनिअरिंग संघाने विजयी लक्ष केवळ १६ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये अभिजीत दहिवाले याने ३५ चेंडूत ९ चौकारांसह ५४ धावा, कर्णधार राजेंद्र तुपे याने ३० चेंडूत ३ चौकारांसह २८ धावा, सोहम नरवडे याने १२ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावा तर अमर यादव याने १२ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले.
जिल्हा वकील युनायटेड संघातर्फे गोलंदाजी करताना जगदीश घनवट याने २४ धावात २ गडी, उमेश गाडेकर सुंदर तल्ले व ओमकार कर्डिले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यांत पंचाची भूमिका महेश जहागीरदार, विशाल चव्हाण, प्रसाद कुलकर्णी, सुनील बनसोडे यांनी तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
रविवारी होणारे सामने
जिल्हा वकील ‘अ’ व घाटी रुग्णालय (सकाळी ८ वाजता), बजाज ऑटो व एशियन हॉस्पिटल (सकाळी ११ वाजता), कंबाईंड बँकर्स व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर (दुपारी २ वाजता).