
सातारा ः स्वराज्य गुणिजन गौरव विकास परिषद सातारा ही शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना स्वराज्य आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार रयत पॅरा मेडिकल कॉलेजचे सीइओ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ संदीप भाऊ शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवराचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी स्वराज्य गुणिजन गौरव विकास परिषद साताराचे अध्यक्ष अविनाश गोंधळी, उपाध्यक्ष अक्षय पवार, सचिव नितीन सुरवसे, कला क्रीडा महासंघ राज्य कार्याध्यक्ष सुनील जाधव, प्रा प्रदीप कांबळे, जिल्हा क्रीडा समनव्यक शिवाजी निकम उपस्थित होते
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे भारतीय संविधानावर श्रद्धा व निष्ठा ठेवून क्रीडा क्षेत्रात कार्य करीत आहेत, समाजातील गोर गरीब वंचित तसेच ग्रामीण भागातील खेळाडूना खेळाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
जिल्ह्यातील खेळाडूना २४ x ७ सेवा ही त्यांची कामाची पद्धती आहे. खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रेरणा देण्याबरोबरच त्यांच्या कागदोपत्री कामासाठी कार्यालयीन दिवस सोडूनही ते शनिवारी, रविवारी अगदी सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध असतात.
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणारे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय ठरले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडू घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सातारा जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संकुलांमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, युवा खेळाडूंना प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि खेळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यात अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. क्रीडाक्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचे कार्य त्यांच्यामुळे शक्य होत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट झाली आहे.
सध्या नितीन तारळकर हे जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा या पदावर उत्कृष्ट कार्य करीत आहेत. एकही दिवस सुट्टी अथवा रजा न घेता जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ते भरीव कार्य करीत आहेत. आपल्या मार्गदर्शन व उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आणि खेळाडूंना विशेष प्रोत्साहनातून त्यांच्या कार्यकाळात जिल्हाला दोन अर्जुन पुरस्कार तसेच जिल्ह्यातील शेकडो खेळाडूना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत साताऱ्याच्या खेळाडूला सुवर्णपदक प्राप्त व्हावे यासाठी अथक आणि यशस्वी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गरजू, अनाथ, वंचित तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना नितीन तारळकर साहेबांचे नेहमीच सहकार्य असते पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक क्रीडा प्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले