बिली जीन किंग आशिया ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत भारताचा पहिला विजय

  • By admin
  • April 10, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

न्यूझीलंड संघाचा दुसरा विजय

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप २०२५ आशिया ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत भारतीय संघाने थायलंड संघाचा २-१ असा पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने थायलंडच्या लानलाना तारारुडीचा ६-२, ६-४ असा पराभव करून संघाचे खाते उघडले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये श्रीवल्लीने धडाकेबाज सुरुवात करत दुसऱ्याच गेममध्ये लानलानाची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या लानलाना हिने जोरदार कमबॅक करत पहिल्याच गेममध्ये श्रीवल्लीची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर श्रीवल्लीने नेट जवळून आक्रमक खेळ करत चौथ्या गेममध्ये लानलानाची सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. दहाव्या गेममध्ये श्रीवल्लीने लानलानाने केलेल्या चुकांचा फायदा घेत तिची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ असा जिंकून विजय मिळवला. 

दुसऱ्या एकेरीच्या लढतीत थायलंडच्या मनांचया सवंगकिंव हिने भारताच्या सहजा यमलापल्लीचा ६-३, ७-६ (३), १-० असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये नवव्या गेममध्ये मनांचयाने सहजाची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. सामन्यात ५-५ अशी बरोबरी असताना अकराव्या गेममध्ये सहजाने मनांचयाची, बाराव्या गेममध्ये मनांचयाने सहजाची सर्व्हिस ब्रेक केली. त्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेककमध्ये सहजाने सुरवातीपासून आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर हा सेट ७-६ (३) असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मनांचयाने सहजाची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व १-० अशी आघाडी घेतली. यावेळी सहजाला क्रॅम्प आल्याने तिने सामन्यातून माघार घेतली. दुहेरीत निर्णायक लढतीत भारताच्या अंकिता रैना हिने प्रार्थना ठोंबरेच्या साथीत पेंगतारण प्लिपूच व थासापॉर्न नाकलो यांचा ७-६ (३), ३-६, १०-३ असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने कोरिया रिपब्लिक संघाचा २-१ असा संघर्षपूर्ण पराभव आपली विजयी घौडदौड कायम राखली. एकेरीत पहिल्या सामन्यात कोरियाच्या सोह्युन पार्क हिने न्यूझीलंडच्या रेनी झांगचा ६-१, ६-० असा तर, दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडच्या लुलू सून हिने देयोन बॅकचा ६-४, ६-१ असा पराभव केला. दुहेरीत निर्णायक लढतीत न्यूझीलंडच्या मोनिक्यू बॅरी व लुलू सून यांनी इनहू ली व डेबिन किम यांचा ६-३, ४-६,१०-८ असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *