
आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप
नवी दिल्ली ः दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या ईस्टर नुरुमी वॉर्डोयोला पराभूत करून बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करून लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.
जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत ३६ व्या स्थानावर असलेल्या वर्दोयोचा ४४ मिनिटांत २१-१५, २१-१९ असा पराभव केला. सिंधूचा सामना प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होईल.
लक्ष्य आणि प्रणयचे आव्हान संपुष्टात
२०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यला पहिल्या फेरीत ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतील उपविजेत्या चायनीज तैपेईच्या ली चिया हाओकडून १८-२१, १०-२१ असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. एच एस प्रणॉय यालाही पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या झू गुआंग ल्यूविरुद्ध पराभव पत्करावा लागला. एक तास आठ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयला चिनी खेळाडूकडून १६-२१, २१-१२, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, किरण जॉर्जने कझाकस्तानच्या दिमित्री पॅनारिनचा ३५ मिनिटांत २१-१६, २१-८ असा पराभव करून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. महिला एकेरीत, आकर्शी कश्यप आणि अनुपमा उपाध्याय यांनीही आपले सामने गमावले आणि स्पर्धेतून बाहेर पडल्या.
महिला दुहेरीत, प्रिया कोंजेंगबाम आणि श्रुती मिश्रा यांना चिनी तैपेईच्या शुओ युन सुंग आणि चिएन हुई यू यांच्याकडून ३५ मिनिटांत ११-२१, १३-२१ असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत हरिहरन आमसाकरुनन आणि रुबन कुमार रेथिनासभापती यांनी श्रीलंकेच्या मधुका दुलांजना आणि लाहिरू वीरासिंघू या जोडीचा अवघ्या १९ मिनिटांत २१-३, २१-१२ असा पराभव केला. पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीला चिउ सियांग चिएह आणि वेंग चिन लिन यांच्या जोडीकडून १९-२१, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.