एमजीएम अकादमीचा नेरळकर अकादमीवर दोन विकेटने विजय

  • By admin
  • April 10, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

युनिव्हर्सल वन-डे लीग ः उदय इरतकर, राघव नाईकची लक्षवेधक कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत एमजीएम क्रिकेट अकादमी संघाने चुरशीच्या सामन्यात नेरळकर क्रिकेट अकादमी संघावर दोन गडी राखून विजय संपादन केला. या लढतीत उदय इरतकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी युनिव्हर्सल करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर केले आहे. नेरळकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेरळकर अकादमी संघाने २७.१ षटकात सर्वबाद १४२ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमजीएम क्रिकेट अकादमी संघाने ३६.३ षटकात आठ बाद १४३ धावा फटकावत दोन गडी राखून सामना जिंकला.

या सामन्यात राघव नाईक याने ९१ चेंडूत ८६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या १४ धावांनी हुकले. राघवने १३ चौकार व एक षटकार मारला. अनिल जाधव याने ५४ चेंडूंत ३० धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. ओम मदने याने ३४ चेंडूत २६ धावा काढल्या. त्याने दोन चौकार मारले.

गोलंदाजीत उदय इरतकर याने अप्रतिम कामगिरी नोंदवली. उदय याने प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या २० धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. संघाच्या विजयात उदय याने मोलाचे योगदान दिले. अब्दुल हादी मोतीवाला याने ३५ धावांत तीन गडी बाद केले. विकास कल्याणकर याने ३९ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः नेरळकर क्रिकेट अकादमी ः २७.१ षटकात सर्वबाद १४२ (राघव नाईक ८६, ओम २२, दक्ष बावत ८, इतर २१, उदय इरतकर ५-२०, विकास कल्याणकर २-३९, ओंकार कर्डिले १-२२, विराज कानडे १-७) पराभूत विरुद्ध एमजीएम क्रिकेट अकादमी ः ३६.३ षटकात आठ बाद १४३ (अनिल जाधव ३०, स्वरित दरक ६, उदय इरतकर १०, ओम मदने २६, विराज कानडे नाबाद ८, विकास कल्याणकर १९, ओंकार कर्डिले ८, आदित्य जे नाबाद १६, इतर १९, अब्दुल हादी मोतीवाला ३-३५, मानव थोरात १-५, कविश पटणी १-३५, ओम १-१८, राघव नाईक १-२६, वेद शर्मा १-४). सामनावीर ः उदय इरतकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *