बजाज ऑटो, कम्बाइंड बँकर्स संघांचे दणदणीत विजय

  • By admin
  • April 10, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः मिलिंद पाटील, सागर तळेकर सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत बजाज ऑटो आणि कम्बाइंड बँक या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांत धमाकेदार कामगिरी बजावत मिलिंद पाटील आणि सागर तळेकर यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. बजाज ऑटो संघाने एशियन हॉस्पिटल संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कम्बाइंड बँकर्स संघाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघावर ४ गडी राखून विजय संपादन केला. जिल्हा वकील अ संघ वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे घाटी रुग्णालय संघास पुढे चाल देण्यात आली आहे.

गुरुवारी पहिला सामना जिल्हा वकील ‘अ’ व घाटी रुग्णालय या संघादरम्यान खेळविण्यात येणार होता. परंतु जिल्हा वकील ‘अ’ संघ वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे घाटी रुग्णालय संघास पुढील चाल देण्यात आली.

दुसरा सामना बजाज ऑटो व एशियन हॉस्पिटल या संघांदरम्यान खेळवण्यात आला. एशियन हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १२१ धावा केल्या. यामध्ये याहिया देशमुख याने २७ चेंडूत २ चौकारांसह २४ धावा, रणजीत साळवे याने ११ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा, रोहन मोहिते याने १३ चेंडूत १ चौकारासह १३ धावा तर दीपक भुजंगे याने १६ चेंडूत १ चौकारासह १२ धावांचे योगदान दिले. बजाज ऑटो संघातर्फे गोलंदाजी करताना अरुण दाणी याने १३ धावात २ गडी तर दीपक कुमार, स्वयं वाघमारे, जतीन लेहकर, आदित्य वर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात बजाज ऑटो संघाने विजयी लक्ष केवळ १५ षटकात एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कर्णधार सागर तळेकर याने अप्रतिम खेळी करताना ४२ चेंडूत ४ चौकारांसह ५५ धावा, विनायक महाजन याने १४ चेंडूत ४ चौकरांसह २२ धावा तर महेश पाडळकर याने ९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावांचे योगदान दिले. एशियन हॉस्पिटल संघातर्फे गोलंदाजी करताना हर्षवर्धन त्रिभुवन याने केवळ एक मात्र गडी बाद केला.

तिसरा सामना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर व कम्बाइंड बँकर्स या संघादरम्यान खेळविण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १३७ धावा केल्या. यामध्ये योगेश सुरकूटलवार याने ३१ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ३७ धावा, निखिल जैन याने २० चेंडूत ३ चौकारांसह २२ धावा, अमोल चौधरी याने १६ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २२ धावा तर हरीओम काळे याने १४ चेंडूत ३ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. कम्बाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना इम्रान खान याने १६ धावांत २ गडी तर सय्यद इनायत अली, कर्णधार शाम लहाने, हरमितसिंग रागी, इंद्रजीत उढान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात कम्बाइंड बँकर्स संघाने विजयी लक्ष १५ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये मिलिंद पाटील याने ३९ चेंडूत १० चौकारांसह ५८ धावांची बहारदार अर्धशतकी खेळी केली. मिलिंद पाटीलच्या आक्रमक फलंदाजीने संघाचा विजय अधिक सोपा झाला. सय्यद आरिफ याने २२ चेंडूत २ चौकारांसह २३ धावा तर भूषण घोळवे याने १० चेंडूत २ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघातर्फे गोलंदाजी करताना निखिल जैन याने २० धावांत २ गडी तर पियुष दुगड, शैलेश घुले व हिमांशू देशपांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

या सामन्यात पंचाची भूमिका उदय बक्षी, हसन जमा खान, अजय देशपांडे, कमलेश यादव यांनी तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

शुक्रवारी होणारे सामने

कॅनेरा बँक व एशियन हॉस्पिटल (सकाळी ८ वाजता), बांधकाम विभाग व लॅब टेक्निशियन (सकाळी ११ वाजता), छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व प्रिसिअस पॉवर (दुपारी २ वाजता).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *