
न्यूझीलंड, थायलंड संघाचे विजय
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप आशिया ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत सुहाना भारतीय संघाने हाँगकाँग-चायना संघाचा २-१ असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयासह आपली आगेकूच कायम राखली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताच्या जागतिक क्रमवारीत ३६४व्या स्थानी असलेल्या वैदेही चौधरी हिने हॉंगकॉंगच्या जागतिक क्रमांक ७५७ असलेल्या हो चिंग वूचा टायब्रेकरमध्ये ७-६ (८), ६-१ असा पराभव करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. आठव्या गेमपर्यंत बरोबरीत खेळ सुरू असताना दोन्ही खेळाडूंनी १२ गेमपर्यंत एकमेकांच्या सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात रंगत निर्माण केली. बरोबरी झाल्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये वैदेहीने वूविरुद्ध वरचढ खेळ करत ७-६ (८) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये वैदेहीने वूला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. या सेटमध्ये वैदेहीने वूची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट ६-१ असा सहज जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या एकेरीच्या लढतीत सर्व टेनिसप्रेमींची फेव्हरेट असलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती हिने हॉंगकॉंगच्या हाँग यी कोडी वांगचा ७-६ (६), २-६, ६-३ असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. हा सामना २ तास २७ मिनिटे चालला. सामन्यात हॉंगकॉंगच्या हाँग यी कोडी वांगने पहिल्याच गेममध्ये भारताच्या श्रीवल्लीची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या श्रीवल्लीने जोरदार खेळ करत आठव्या गेममध्ये हाँगची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये श्रीवल्लीने आपल्या बिनतोड सर्व्हिस आणि रॅलीच्या जोरावर हा सेट ७-६ (६) असा पराभव करून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये हॉंगकॉंगच्या हाँगने आपला खेळ उंचावत दुसऱ्या, चौथ्या, आठव्या गेममध्ये श्रीवल्लीची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-२ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये श्रीवल्लीने आक्रमक पवित्रा स्वीकारत तिसऱ्या गेममध्ये हाँगची सर्व्हिस भेदली व सामन्यात आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत श्रीवल्लीने सातव्या, नवव्या गेममध्ये हाँगची सर्व्हिस पुन्हा भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून सामन्यात भारताला २-० अशी विजयी आघाडी प्राप्त करून दिली.
दुहेरीच्या औपचारिक लढतीत हॉंगकॉंगच्या हाँग यी कोडी वांग व मॅन यिंग मॅगी एनजी या जोडीने भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा ६-७ (२), ६-३, १३-११ असा पराभव केला.
दुसऱ्या लढतीत मनांचया सवंगकिंव, पेंगतारण प्लिपूच, थासापॉर्न नाकलो यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर थायलंड संघाने कोरिया रिपब्लिक संघाचा २-१ असा संघर्षपूर्ण पराभव केला. अन्य लढतीत न्यूझीलंड संघाने चायनीज तैपेई संघाचा २-१ असा पराभव करून विजयाची हॅटट्रिक केली.