
चेक अँड मेट चषक बुद्धिबळ स्पर्धा
सोलापूर ः चेक अँड मेट चषक खुल्या तसेच ९ व ७ वर्षांखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर श्रेयांस शहा, विजय पंगुडवाले, विशाल पटवर्धन, बार्शीचा शंकर साळुंके, बीएसएनएलचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त पवन राठी, प्रसन्ना जगदाळे, सागर गांधी, धाराशिवचे ज्येष्ठ खेळाडू नंदकुमार सुरू, साईराज घोडके, वेदांत मुसळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, हिमांशु व्हानगावडे यांच्यासह २७ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
ॲड. कोमलताई अजय साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा जुळे सोलापूर येथील मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सुरू आहे. या स्पर्धेत सोलापूर शहरासह माळशिरस, करमाळा, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा तसेच धाराशिव जिल्ह्यातील १७६ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
९ वर्षांखालील गटात नैतिक होटकर, आदित्य जंगवाली, अद्विक ठोंबरे, आरुष माने, अन्वी बिटला, तन्वी बागेवाडी, ईशा पटवर्धन या उदयोन्मुख खेळाडूदेखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे, प्रा. गुरव डी. एफ., प्रा. हेडे एस. एस., प्रा. जाधव आर. बी, प्रा. माने व्ही. एल, प्रा. कोळी आर. पी, ग्रंथपाल साळुंखे आर. एम व धसाडे आर. ए., शिंदे अमर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांनी आभार मानले.