
शिर्डी ः महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ, शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट मुंबई महानगरपालिका व सर्व सहयोगी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दुसरे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे महा अधिवेशन १२ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी शिर्डी शहर सज्ज झाले आहे.

शारीरिक शिक्षण शिक्षकांचे महा अधिवेशन सप्तपदी मंगल कार्यालय, शिर्डी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या महाधिवेशनात शारीरिक शिक्षकांना आधुनिक क्रीडा तंत्रज्ञान, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, मूल्यमापन, फिट इंडिया तसेच नवीन शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या क्रीडा अधिवेशनास महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून जवळपास चार हजार शिक्षक उपस्थित राहणार आहेत. सदर महाराष्ट्र राज्य स्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षकांचे महाधिवेशन हे डिजिटल युगातील फिजिकल फिटनेस व फिजिकल लिटरसी ही थीम घेऊन करीत आहे. शिक्षण आणि क्रीडा यांची सांगड घालणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी या प्रेरणादायी अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी (१३ एप्रिल) सकाळी ९.४५ वाजता होणार आहे. या प्रसंगी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती मुंबईचे प्रमुख डॉ जितेंद्र लिंबकर यांनी दिली. या महाधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, ज्ञानेश काळे, शरद वाबळे, संजय पाटील व सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे सहकार्य लाभत आहे.