
युनिव्हर्सल वन-डे लीग ः प्रेम कासुरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युनिव्हर्सल अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघाने नेरळकर क्रिकेट अकादमी संघाचा १०८ धावांनी पराभव करुन आगेकूच केली. या सामन्यात प्रेम कासुरे याने सामनावीर किताब संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन यूनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर केले आहे. युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघाने ५० षटकात सर्वबाद २४४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेरळकर क्रिकेट अकादमीने २४.४ षटकात सर्वबाद १३६ धावा काढल्या.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीने तब्बल १०८ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली. या सामन्यात राघव नाईक याने शानदार फलंदाजी केली. राघव नाईक याने अवघ्या ५० चेंडूत ९१ धावांची वादळी खेळी साकारली. त्याने आक्रमक फटकेबाजी करताना सहा षटकार व बारा चौकार मारले. प्रेम कुसारे याने धमाकेदार फलंदाजी करत ४७ चेंडूत अर्धशतक ठोकले. प्रेम याने ५६ धावांची जलद खेळी करताना चार उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. आयुष देवरे याने ५० चेंडूत ३६ धावांची खेळी केली. त्याने चार चौकार मारले.
गोलंदाजीत सोहम कोरवी याने १७ धावांत चार गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. सार्थक येडे याने १८ धावांत तीन विकेट घेतल्या. प्रेम कासुरे याने ८ धावांत दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. अष्टपैलू कामगिरीमुळे प्रेम कासुरे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी ः ५० षटकात सर्वबाद २४४ (कृतार्थ पाडळकर १९, वैष्णव गायकर १९, सोहम नरवडे ९, आयुष देवरे ३६, सार्थक येडे २९, विश्वजित राजपूत १२, प्रेम कुसारे ५६, शौर्य सलामपुरे नाबाद ११, ऋग्वेद जाधव ६, इतर ४७, सोहम कोरवी ४-१७, अब्दुल हादी मोतीवाला २-४६, राघव नाईक २-५४, यशराज गव्हाड १-२२) विजयी विरुद्ध नेरळकर क्रिकेट अकादमी ः २४.४ षटकात सर्वबाद १३६ (राघव नाईक ९१, अब्दुल हादी मोतीवाला ७, यशराज गव्हाड ७, वेदांत परदेशी ९, इतर १५, सार्थक येडे ३-१८, प्रेम कुसारे २-८, मयंक कदम २-२४, सोहम नरवडे १-१८). सामनावीर ः प्रेम कुसारे.