
ठाणे : महाराष्ट राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची भेट घेऊन त्यांना सध्या बंद असलेल्या आपले सरकार पोर्टल व सतत आलेल्या शासकीय सुट्या याबाबत सविस्तर माहिती दिली. शालेय खेळाडूंचे ग्रेस गुण प्रस्ताव सादर करण्या बाबत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची विनंती मान्य करुन शरद गोसावी यांनी २१ एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे.

ही मुदत वाढ करुन देण्याबाबत पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी देखील मंडळाच्या अध्यक्षांना फोन करुन सांगितले. या मुदत वाढीच्या यशात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. तसेच ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे व ठाणे महानगरपालिका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव एकनाथ पवळे यांनी ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के यांना निवेदन देऊन मुदत वाढीची मागणी केली होती. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. ठाणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व खेळाडूंच्या पालकांनी महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे आभार मानले.