
सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा
मुंबई ः सांताक्रूझ कालिना येथे सुरू असलेल्या सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात आणि उत्कंठावर्धक वातावरणात सामने पार पडले. मुंबईचा बालाजी क्लब आणि कोलकत्त्याचा एंजेल धमाका यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा खेळ सादर केला. दोन सामन्यांमध्ये यश मिळवत बालाजी क्लबने अंतिम फेरीकडे आपली दमदार घोडदौड सुरू ठेवली.
पहिल्या सामन्यात बालाजी क्लब, मुंबईने दिपक दादा प्रतिष्ठान ग्लोरिअस मैत्री, सिंधुदुर्ग संघाविरुद्ध ८ षटकांत ५ गडी गमावून ७२ धावा केल्या. यामध्ये फर्दिन काझीने फटकेबाजी करत २१ चेंडूत ३९ धावा करत संघाला चांगली सलामी दिली. प्रतिस्पर्धी संघाकडून प्रज्वल कर्नाटकने ३ बळी घेत चांगली कामगिरी केली. मात्र, सिंधुदुर्ग संघ ८ षटकांत केवळ ५९ धावा करू शकला आणि बालाजी क्लबने हा सामना १३ धावांनी जिंकला. फर्दिन काझी मॅन ऑफ द मॅच ठरला.
दुसऱ्या सामन्यात एंजेल धमाका, कोलकत्ता संघाने विक्रोळीअन्स रोहित इलेव्हन, मुंबई संघाविरुद्ध ८ षटकांत ८६ धावांचा डोंगर उभारला. संजू कनोजीया (२१ धावा) आणि साहिल लोंगळे (२ बळी) यांच्या कामगिरीने संघाला बळ दिले. प्रतिस्पर्धी विक्रोळीअन्स संघाने मंगेश वैतीच्या (४२ धावा) प्रयत्नांनंतरही ७ गडी गमावून ५७ धावांपर्यंत मजल मारली आणि सामना एंजेल धमाकाने २९ धावांनी जिंकला. या सामन्यात जगत सरकार मॅन ऑफ द मॅच ठरला.
उपउपांत्य फेरीत बालाजी क्लब, मुंबई आणि एंजेल धमाका, कोलकत्ता यांच्यात सामना झाला. एंजेल धमाकाने प्रथम फलंदाजी करत ८ षटकांत ८ गडी गमावून ६७ धावा केल्या. सरोज प्रामाणिकने २७ धावा तर इमरोझ खानने जबरदस्त मारा करत ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात बालाजी क्लबने फक्त ६ षटके २ चेंडूंत ४ गडी गमावून ७१ धावा करत विजय साकारला. या सामन्यात इमरोझ खान मॅन ऑफ द मॅच ठरला.
स्पर्धेचा पुढील टप्पा आणखीच रंगतदार होण्याची शक्यता असून, बालाजी क्लबच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. एंजेल धमाकाने सुद्धा आपला लढवय्या वृत्तीचा परिचय दिला असून आगामी सामन्यांमध्ये जोरदार झुंज अपेक्षित आहे.