
मित्सुई शोजी टी २० क्रिकेट स्पर्धा
मुंबई ः हर्षल जाधवच्या अष्टपैलू खेळामुळे (नाबाद ६६ धावा आणि ४ बळी) घाटकोपर जेट्स संघाने बांद्रा हिरोज संघावर ११ धावांनी चुरशीचा विजय मिळविला तर मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने शिवाजी पार्क वॉरियर्स संघावर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
ज्वाला सिंग यांच्या ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसीच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेत घाटकोपर जेट्स संघाने पोलीस जिमखाना येथील लढतीत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७७ धावांचे लक्ष्य उभारले. आर्यन पटणी (२६) आणि आदित्य श्रीवास्तव (२५) यांनी ५२ धावांची सलामी दिल्यानंतर हर्षल जाधव (नाबाद ६६), साई चव्हाण (नाबाद (२०) यांनी संघाला १७७ धावांची मजल मारून दिली. डावखुरा फिरकी गोलंदाज अनुज गिरी (१९/२) आणि ऑफ स्पिनर निशांत त्रिवेदी (२८/२) यांनी चांगली गोलंदाजी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना प्रयाग भाटी (७३) आणि प्रिन्स यादव (२४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागी करून विजयासाठी प्रयत्न केले, मात्र हर्षल जाधव यांनी आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने ४ विकेट्स मिळवत त्यांच्या आव्हानातली हवा काढून टाकली. त्याला मध्यमगती धनीत राऊत (२६/२) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज यश डिचोलकर (३२/२) यांची चांगली साथ मिळाली आणि त्यांनी बांद्रा हिरोज संघाना ८ बाद १६६ धावांवर रोखून विजय साकारला.

ओव्हल मैदान येथील लढतीत (सचिवालय जिमखाना) मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून किंचित दमट असलेल्या विकेट चा फायदा उठविण्यासाठी शिवाजी पार्क वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. त्यांचे हे डावपेच चांगलेच यशस्वी ठरले. मध्यमगती गोलंदाज योगेश पाटील (१७/३) आणि अमोल तनपुरे (२४/२) यांनी १४ धावांतच त्यांचा निम्मा संघ तंबूत पाठवला. या धक्क्यातून त्यांचा संघ सावरू शकला नाही . सुवेद पारकर याने एकाकी किल्ला लढवत ३३ धावा केल्या आणि त्यांचा डाव १५.४ षटकांत ८१ धावांत आटोपला. डावखुरा फिरकी गोलंदाज आर्यराज निकम याने ६ धावांत २ बळी मिळविले.
या आव्हानाचा पाठलाग करताना पोलिस संघाने ३० धावांत २ बळी गमावले होते, मात्र हर्ष साळुंखे (नाबाद ५५) आणि हर्ष आघाव (नाबाद १०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची अभेद्य भागी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. योगेश पाटील याचीच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः (पोलिस जिमखाना) घाटकोपर जेट्स ः २० षटकांत ६ बाद १७७ (आर्यन पटनी २६, आदित्य श्रीवास्तव २५, प्रगणेश कानपिल्लेवार १८, हर्षल जाधव नाबाद ६६, साई चव्हाण नाबाद २०; अनुज गिरी १९/२, निशांत त्रिवेदी २८/२) विजयी विरुद्ध बांद्रा हिरोज ः २० षटकांत ८ बाद १६६ (प्रयाग भाटी ७३, प्रिन्स यादव २४, मुकेश गुप्ता २४, अनुज गिरी नाबाद १३; हर्ष जाधव २३/४, धानीत राऊत २६/२, यश डिचोलकर ३२/२). सामनावीर ः हर्षल जाधव.
ओव्हल मैदान ः शिवाजी पार्क वॉरियर्स ः १५.४ षटकांत सर्वबाद ८१ (सुवेद पारकर ३३, योगेश पाटील १७/३, अमोल तनपुरे २४/२, आर्यराज निकम ६/२) पराभूत विरुद्ध मुंबई पोलिस सिटी रायडर्स ः १०.३ षटकांत २ बाद ८२ (हर्ष साळुंखे नाबाद ५५, हर्ष आघाव नाबाद १०). सामनावीर ः योगेश पाटील.