
शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : अब्दुल कय्युमचे शतक, राहुल जोनवालची हॅटट्रिक, योगेश नेब सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा वकील संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि शहर पोलिस या संघांनी शानदार विजय साकारत आगेकूच केली. अब्दुल कय्युमचे धमाकेदार शतक व राहुल जोनवालची हॅटट्रिक सामन्याचे खास वैशिष्ट्य ठरले.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंह क्रिकेट सामन्यांमध्ये शनिवारी खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्याच्या पहिल्या सामन्यात जिल्हा वकील युनायटेड संघाने एसटी महामंडळ संघावर २२ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात इंडियन मेडिकल असोसिएशन संघाने महावितरण ‘ब’ संघावर २० धावांनी विजय नोंदला. तिसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघाने डीआयएजीइओ संघावर ८ गडी राखून विजय संपादन केला. या सामन्यात योगेश नेब, अब्दुल कय्युम व राहुल जोनवाल हे भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

पहिला सामना जिल्हा वकील युनायटेड व एसटी महामंडळ संघांदरम्यान खेळविण्यात आला. जिल्हा वकील युनायटेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १६२ धावा केल्या. यामध्ये योगेश नेब याने ५१ चेंडूत १० चौकारांसह ७४ धावा, सतीश बनसोडे याने २४ चेंडूत दोन चौकारांसह १७ धावा, दीपक वीर याने ८ चेंडूत २ चौकारांसह १५ धावा तर सुंदर तल्ले याने ६ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. एसटी महामंडळ संघातर्फे गोलंदाजी करताना कैलास जाधव याने ३१ धावांत ३ गडी, सुनील फताळे याने ३३ धावांत २ गडी, सचिन क्षीरसागर याने २४ धावांत २ गडी तर कर्णधार मधुकर साळवे व अतुल पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात एसटी महामंडळ संघ २० षटकात केवळ १४० धावाच करू शकला. यामध्ये आकाश शेळके याने सर्वाधिक ४३ चेंडूत १ षटकार व ८ चौकारांसह ६३ धावा, प्रदीप तगड याने २६ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा, कैलास जाधव याने १४ चेंडूत १ चौकारासह १२ धावा तर सागर वाकळे याने ११ चेंडूत १ चौकारासह ११ धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील युनायटेड संघातर्फे गोलंदाजी करताना जगदीश बनसोड याने २० धावांत २ गडी तर जगदीश घनवट, उमेश गाडेकर, सुंदर तल्ले व सुनील घळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसरा सामना इंडियन मेडिकल असोसिएशन व महावितरण ‘ब’ या संघादरम्यान खेळविण्यात आला. महावितरण ‘ब’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशन संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ बाद १७७ धावा केल्या. यामध्ये अब्दुल कय्युम याने अप्रतिम खेळी करताना केवळ ५० चेंडूत ७ उत्तुंग षटकार व ११ चौकारांसह ११० धावा, मशदुल सय्यद याने २७ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २८ धावा तर अमोदिक नैफ याने १० चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १६ धावांचे योगदान दिले. महावितरण ‘ब’ संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार संजय शाहीर, बाळासाहेब मगर व राहुल शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात महावितरण ब संघ २० षटकात ५ बाद १५७ धावाच करू शकला. यामध्ये राहुल शर्मा याने ३१ चेंडूत ६ चौकारांसह ४४ धावा, कर्णधार संजय शाहीर याने २५ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ३८ धावा, बाळासाहेब मगर याने २७ चेंडूत १ षटकार व तीन चौकारांसह २३ धावा तर समीर शेख याने १८ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले. इंडियन मेडिकल असोसिएशन संघातर्फे गोलंदाजी करताना आमोदिक नैफ ३८ धावांत ३ गडी तर आमेर बदाम व खालेद बदाम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तिसरा सामना शहर पोलीस व डीआयएजीइओ या संघांदरम्यान खेळण्यात आला शहर पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. डीआयएजीओ संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना १४ षटकात सर्वबाद ७४ धावा करू शकला. यामध्ये आदित्य याने २१ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा, अभिजीत मुंडे याने १५ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा तर आकाश अभंग व सम्राट राज यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. शहर पोलिस संघातर्फे गोलंदाजी करताना राहुल जोनवाल याने २० धावांत ४ गडी, सुदर्शन एखंडे याने १५ धावांत ३ गडी साई चौधरी याने ८ धावात २ गडी तर दीपक चव्हाण याने २७ धावांत १ गडी बाद केला.
शहर पोलिस संघाने विजयी लक्ष केवळ ५ षटकात व दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये विशाल नरवडे याने १६ चेंडूत ६ चौकारांसह ३१ धावा व सुदर्शन एखंडे याने ७ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. डीआयएजीइओ संघातर्फे गोलंदाजी करताना सागर तोंडे व सौरभ शिंदे आणि प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यात पंचाची भूमिका प्रसाद कुलकर्णी, रायफ्फुदिन नेहरी, महेश सावंत, आशिष देशपांडे, कमलेश यादव, सुनील बनसोडे तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
रविवारी होणारे सामने
जिल्हा वकील व वन विभाग (सकाळी ७.३० वाजता)
रुचा इंजीनियरिंग व लॅब टेक्निशियन (सकाळी ११ वाजता)
होमिओपॅथिक डॉक्टर्स व जिल्हा वकील युनायटेड (दुपारी २ वाजता)