
भारतीय संघ बिली जीन किंग कप स्पर्धेसाठी पात्र
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप २०२५ आशिया ओशनिया गट १ महिला टेनिस स्पर्धेत सुहाना भारत संघाने कोरिया रिपब्लिक संघाचा २-१ असा पराभव करून सलग चौथ्या विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखत प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला. भारतीय संघाने ५ सामन्यात १ पराभव, ४ विजय प्राप्त केले. भारताबरोबरच न्यूझीलंड संघाने देखील प्ले ऑफ मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पाचव्या दिवशी पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती हिने कोरिया रिपब्लिकच्या सोह्युन पार्कचा ५-७, ६-३, ७-६ (५) असा पराभव करून संघाचे खाते उघडले. हा सामना २ तास ५२ मिनिटे चालला. सामन्यात श्रीवल्लीने सुरेख सुरुवात करत सोह्यूनची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी श्रीवल्लीला फार काळ टिकवता आली नाही. सोहयुन हिने आक्रमक खेळ करत सातव्या, अकराव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीने जोरदार पुनरागमन करत सहाव्या, आठव्या गेममध्ये सोह्यूनची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात ५-५ अशी बरोबरी असताना अकराव्या गेममध्ये श्रीवल्लीने सोह्यूनची, तर बाराव्या गेममध्ये सोह्यूनने श्रीवल्लीची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ६-६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकमध्ये श्रीवल्लीने आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर हा सेट ७-६ (५) असा जिंकून संघाला विजय मिळवून दिला. श्रीवल्लीने आपल्या खेळीत १२ एसेससह आपले वर्चस्व राखले.
दुसऱ्या एकेरीच्या लढतीत कोरिया रिपब्लिकच्या देयोन बॅक हिने भारताच्या सहजा यमलापल्लीचा ६-३, ६-४ असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. हा सामना १ तास ४५ मिनिटे चालला. सामन्यात बॅकने सहजाची दुसऱ्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील बॅकने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत सहजाची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात ५-१ अशी आघाडी प्राप्त केली. सहजाने आपली आक्रमणाची धार अधिक तीव्र करत आठव्या गेममध्ये बॅकची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यातील ४-५ ने कमी केली. पण आघाडीवर असलेल्या बॅकने स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकून सामन्यात विजय मिळवला. तिसऱ्या व निर्णायक दुहेरीच्या लढतीत सामन्यात सुरुवातीला ४-४ अशी बरोबरी असताना नवव्या गेममध्ये अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे जोडीने नवव्या गेममध्ये डेबिन किम व सोह्युन पार्कची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये भारताच्या जोडीने पहिल्याच गेममध्ये कोरियाची सर्व्हिस रोखली, पण चौथ्या गेममध्ये कोरियाने भारताची सर्व्हिस रोखली व २-२ अशी बरोबरी निर्माण केली. पाचव्या, सातव्या, नवव्या गेममध्ये अंकिता व प्रार्थनाने कमालीचा खेळ दाखवत डेबिन किम व सोह्युन पार्कची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत ६-३ असा पराभव करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत मॅन यीन मॅगी एमजी, एड्युस चोंग यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर हाँगकाँग-चायना संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाचा २-१ असा पराभव केला. थायलंड संघाने चायनीज तैपेई संघाचा २-१ असा पराभव केला. विजयी संघाकडून लानलाना तारारुडी, पॅचरिन चीपचंडेज, पेंगतारण प्लिपूच यांनी सुरेख कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तसेच, महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा विभागाबरोबरच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा पाठिंबा लाभलेल्या या स्पर्धेला बिसलेरी, शिव-नरेश, मणिपाल हॉस्पिटल, इको फॅक्टरी फाउंडेशन(टीइएफएफ) आणि डनलॉप यांचेही सह प्रायोजकत्व लाभले आहे.