श्रीलंकन अखिलच्या भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकचा हॉस्पेट संघ उपांत्य फेरीत 

  • By admin
  • April 13, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धा

मुंबई : टेनिस मधील वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या सुप्रिमोचा तिसरा दिवस गाजवला तो श्रीलंकन गोलंदाज अखिल याने. अखिलच्या जादुई स्पेलमुळे कर्नाटकच्या एफ एम हॉस्पेट संघाने केरळच्या सुल्तान ब्रदर्स पायरट्सचा ८ विकेट राखून पराभव करीत सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

सांताक्रूझच्या एअर इंडिया मैदानावर श्रीलंकन स्टार बॉलर अखिल याने घातक गोलंदाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने १ मेडन ओव्हर टाकतानाच अवघ्या ४ रन्समध्ये २ विकेट घेतल्यामुळे केरळच्या सुल्तान ब्रदर्स पायरट्स संघाला ८ ओव्हरमध्ये ८ विकेटच्या मोबदल्यात ५६ धावा करता आल्या. कर्नाटकच्या हॉस्पेट संघाने हे आव्हान लिलया पेलत ८ विकेट शिल्लक ठेवून शानदार विजय मिळवित दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

हॉस्पेटतर्फे प्रथमेश पवारने ११ चेंडूत २० धावा केल्या. हॉस्पेट संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या श्रीलंकेच्या अखिल याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरविण्यात आले. कर्नाटकच्या एफ एम हॉस्पेटसोबत आता पुण्याच्या डिंगडॉग आणि मुंबईच्या बालाजी क्लबने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
दरम्यान उपउपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकच्या एफ एम हॉस्पेट संघाने किरण पवारच्या २३ चेंडूतील ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर चुरशीच्या लढतीत डोंबिवलीच्या शांतीरत्न संघाचा पाच विकेटने पराभव केला. शांतीरत्न संघाने ८ ओव्हरमध्ये ७ विकेटच्या मोबदल्यात ६९ धावा केल्या. हॉस्पेट संघाने सामनावीर ठरलेल्या किरण पवारच्या जिगरबाज खेळाच्या जोरावर एक चेंडू शिल्लक ठेवून हे आव्हान पार केले. किरण पवारने आपल्या शानदार खेळीत १ षटकारासह ४ चौकार वसूल केले.

उपउपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत केरळच्या सुलतान ब्रदर्स पायरट्स संघाने रायगडच्या ट्रायडेंट मयूर इलेव्हन संघाचा २४ धावांनी पराभव केला. सामनावीर ठरलेल्या रोशनच्या २१ चेंडूतील ३६ धावांच्या जोरावर ८ ओव्हरमध्ये २ विकेटच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या. रोशनने १ चौकारासहीत एकूण ४ षटकारांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरात रायगडचा ट्रायडेंट मयूर इलेव्हन संघ ८ षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात ५३ धावाच करू शकला.

स्पर्धेस शिवसेना नेते अनिल परब, स्पर्धा आयोजक आमदार संजय पोतनीस, खासदार संजय दीना पाटील, आमदार सुनील प्रभू, सचिन अहिर, अमोल कीर्तिकर, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, विनोद पाटील, राजेश अग्नेलो अथाइडे, तन्मय भैय्या आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *