
मुंबई विद्यापीठाचा व रत्नागिरीचा आकाश कदम स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
मुंबई ः उडपी (कर्नाटक) येथील पूर्णप्रज्ञा कॉलेज येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत यजमान मेंगलोर विद्यापीठाने अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठावर थरारक विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली, तर मुंबई विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावत अभिमानास्पद कामगिरी केली.
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर विभागातील प्रत्येकी चार अशा देशभरातील १६ सर्वोत्तम विद्यापीठ संघांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात मेंगलोर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाचा ५.१० मिनिटे राखून ११-१० (मध्यंतर ७-५) असा एक गुणाने पराभव करत चुरशीचा सामना जिंकला.
आकाश कदम सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या आकाश कदम (रत्नागिरी) याने कर्णधारास साजेसा खेळ करत १.५० व १.४० मिनिटांचे जबरदस्त संरक्षण आणि एक गुण घेत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला “स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू” हा मानाचा किताब मिळाला. त्याला संकेत जाधव (१.२०, १.५० मि. संरक्षण), शुभम जाधव (१.५० मि. संरक्षण), प्रथमेश दुर्गावले, आदित्य कांबळे (प्रत्येकी १ मि. संरक्षण व २ गुण), व अभय रत्नाकर (३ गुण) यांनी मोलाची साथ दिली मात्र त्यांना मुंबई विद्यापीठाला पराभवापासून वाचवता आले नाही.
मेंगलोर संघाची प्रभावी कामगिरी
विजेत्या मेंगलोर विद्यापीठाच्या मरेप्पा (१.५०, २.५० मि. संरक्षण), स्वामी (१.५०, ३.२० मि. संरक्षण १ गुण), सुहास (१.५०, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेषतः स्वामीच्या ३.२० मिनिटांच्या संरक्षणाने सामन्याचा रंगच बदलला.
मुंबईची प्रभावी वाटचाल
मुंबई विद्यापीठाने अंतिम फेरीत पोहोचण्याआधी उप उपांत्य फेरीत दिल्ली विद्यापीठाला, तर उपांत्य फेरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, मराठवाडा यांना नमवले.
या शानदार कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ अजय भामरे आणि कुलसचिव डॉ प्रसाद कारंडे यांनी संघाचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईच्या संघाचे प्रशिक्षक डलेश देसाई आणि शशांक उपशेटे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, तर क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी स्पर्धेदरम्यान संघाला सुसंघटित पाठबळ पुरवले.
स्पर्धेचा शौर्यगाथा ठरलेला अंतिम सामना
क्षणोक्षणी बदलणारी खेळी, एकमेकांशी झुंज देणारे खेळाडू आणि अखेरच्या क्षणापर्यंत रोमहर्षक असलेली स्पर्धा यामुळे या वर्षीची खो-खो स्पर्धा अविस्मरणीय ठरली. मुंबई विद्यापीठाचे जरी विजेतेपद हुकवले, तरी संघाच्या एकजुटीचा आणि खेळातील गुणवत्ता प्रदर्शनाचा ठसा निश्चितच उठून दिसला!