
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजन, जगातील अव्वल महिला खेळाडूंचा सहभाग
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रांप्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यात या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळ पत्रांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून यामध्ये भारताची रॅपिड बुद्धिबळ जगज्जेती ग्रँडमास्टर कोनेरु हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली व ग्रँडमास्टर वैशाली आर, आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख या आंतराराष्ट्रीय खेळाडू भारताचे आव्हान सांभाळणार आहेत. ही स्पर्धा अमनोरा द फर्न येथे १४ ते २४ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे.
सोमवारपासून (१४ एप्रिल) रंगणाऱ्या पहिल्या फेरीत कोनेरु हंपी व वैशाली आर या भारताच्या खेळाडूंमध्ये लढत रंगणार आहे. तर, भारताच्या ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली समोर चीनच्या ग्रँडमास्टर झू जीनरचे कडवे आव्हान असणार आहे. तसेच, भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिला बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सालिनोव्हा न्यूरघ्युन हिच्याशी सामना करावा लागणार असून अन्य दोन लढतींमध्ये पोलंडची आंतरराष्ट्रीय मास्टर एलिना कॅशलीनस्काया विरुद्ध रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर पोलिना शुव्हालोहा आणि मंगोलियाची आंतरराष्ट्रीय मास्टर बॅट खुयाक विरुद्ध जॉर्जियाची आंतरराष्ट्रीय मास्टर मेलिना सॅलोम यांच्यात लढत रंगणार आहे.
जगातील अव्वल २० महिला खेळाडूंमधील १४ खेळाडूंची त्यांच्या यापूर्वीच्या टप्प्यातील कामगिरीच्या आधारावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून स्पर्धेच्या सहा सत्रांच्या संयोजकांनी निवडलेल्या प्रत्येकी एका खेळाडू अशा एकूण ६ खेळाडूंचा वाईल्ड कार्ड द्वारे समावेश करण्यात आला आहे.
भारतातर्फे नागपूरची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला असून ती सध्याची जगातील सर्वोच्च मानांकित ज्युनियर खेळाडू आहे.
महिलांच्या फिडे स्पर्धा मालिकेतील या आधीच्या टप्प्याचे आयोजन जॉर्जिया, कझाकस्तान, मोनॅको व सायप्रस येथे आयोजित करण्यात आले होते. आता भारत व ऑस्ट्रेलिया येथे मिळून होणाऱ्या अशा सहा ठिकाणी होणाऱ्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडीडेट स्पर्धेसाठी या स्पर्धेतून पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे जागतिक स्पर्धेची आव्हानवीर संधी मिळणार असल्यामुळे या स्पर्धेला अत्यंत महत्व आहे.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले हे या स्पर्धेचे संचालक असून इव्हान सायरोव्ही हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. पुण्याच्या दिप्ती शिदोरे डेप्युटी चीफ आरबीटर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून मार्गेट ब्रोको या स्पर्धेच्या आरबीटर असणार आहेत.
स्पर्धेचे सामने राऊंड रॉबिन पद्धतीने ९ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचे सरासरी रेटिंग २४५४ आहे. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव व स्पर्धा संचालक निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.