
नागपूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी यांच्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल बैस (नागपूर) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. राहुल बैस यांनी एआयच्या मदतीने शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, सोपे आणि कमी वेळात कसे पूर्ण करता येते, याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच, खेळ क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येतो याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करून उपस्थितांना नविन तंत्रज्ञानाच्या उपयोगाची माहिती दिली.
या कार्यक्रमास नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी व आस्थापना कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले.