
युनिव्हर्सल वन-डे लीग ः संकर्षण खांडेकर, श्रावणी खडकेची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्य़ा युनिव्हर्सल करंडक अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पाटील क्रिकेट अकादमी संघाने जॉन्टी क्रिकेट अकादमी संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. संकर्षण खांडेकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर होत आहे. जॉन्टी क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाटील क्रिकेट अकादमीच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे जॉन्टी क्रिकेट अकादमी संघ २२.४ षटकात नऊ बाद १०३ धावा काढण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर पाटील क्रिकेट अकादमीने अवघ्या १४.२ षटकात दोन बाद १०७ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात आदित्य शिंदे याने ४२ चेंडूत ५३ धावांची वेगवान खेळी केली. त्याने आठ चौकार मारले. यश अंबोटकर याने आठ चौकारांसह ४१ धावा फटकावल्या. सर्वज्ञ छबिलवाड याने ३२ चेंडूत ३३ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन चौकार मारले.

गोलंदाजीत संकर्षण खांडेकर याने २५ धावांत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आकाश शेळके याने नऊ धावांत दोन बळी घेतले. श्रावणी खडके हिने १७ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः जॉन्टी क्रिकेट अकादमी ः २२.४ षटकात नऊ बाद १०३ (यश डोईफोडे २२, श्रावणी खडके १०, यश अंबोटकर ४१, गोविंद जाधव १२, संकर्षण खांडेकर ३-२५, आकाश शेळके २-९, अर्जुन १-१८, दर्शन भारसकळ १-१६, शिवंजय गोंडे पाटील १-३०, निखिल भालेराव १-४) पराभूत विरुद्ध पाटील क्रिकेट अकादमी ः १४.२ षटकात दोन बाद १०७ (आदित्य शिंदे नाबाद ५३, निखिल भालेराव ४, अतुल ३, सर्वज्ञ छबिलवाड नाबाद ३३, श्रावणी खडके २-१७). सामनावीर ः संकर्षण खांडेकर.