
राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षक महा अधिवेशनाचे उद्घाटन
शिर्डी ः खेळल्याशिवाय जीवनात खरा आनंद नाही, असे मत व्यक्त करताना विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी २०१२ पासून क्रीडा शिक्षकांची भरती झालेली नाही, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद केले. गेल्या १३ वर्षांपासून भरती न होणं हे दुर्दैव आहे. आपण याबाबत अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे,” असे प्रा शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रा राम शिंदे हे शिर्डी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षक महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर हे उपस्थित होते. या महाअधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक आलेले आहेत.
प्रा राम शिंदे पुढे म्हणाले की, भारताचा आदर्श नागरिक घडवण्यासाठी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक २५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक असणे आवश्यक आहे. क्रीडा धोरणाला हलके समजण्याची चूक करू नये. हे धोरण सक्षम असेल तरच देश सुखी राहील. शासन क्रीडा शिक्षकांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील आहे. कुणी ऐकत नसेल, तर मी स्वतः त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचवेन.”
“व्यायाम आणि क्रीडेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. राज्याला क्रीडा शिक्षकांची नितांत गरज आहे. तुमच्यात एकजूट असली पाहिजे. विनाअनुदानित शिक्षकांना अत्यंत कमी वेतन दिलं जातं, हे अन्यायकारक आहे. ग्रामसेवक व कृषी सहायकांसाठी जे धोरण आखले गेले आहे, तेच धोरण या शिक्षकांसाठीही असावं,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष डॉ आनंद पवार, शिवदत्त ढवळे, प्रशांत कोल्हे, लक्ष्मण चलमले, ज्ञानेश काळे व जालिंदर आवारी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांवर मनोगत व्यक्त केले. तर, राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी एकजुटीमुळेच क्रीडा शिक्षक संच मान्यता प्राप्त झाला. मात्र, अजूनही अनेक समस्या प्रलंबित आहेत. आजच्या विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाकडे वाढता कल चिंताजनक आहे. मैदानावर आलेला विद्यार्थीच उज्वल भवितव्य घडवू शकतो,” असे कोतकर यांनी सांगितले.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवम पठारे याचा प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. संतोष खैरनार यांच्या गटाने योग व प्राणायामावर आधारित प्रात्यक्षिक सादर केली. दुपारच्या सत्रात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी “क्रीडा शिक्षकांच्या समस्या संसदेत मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन दिले.
आमदार सत्यजित तांबे यांनी “फक्त राजकीय व्यक्तींवर विसंबू नका. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी जागरूकतेची गरज आहे आणि ती तुमच्या माध्यमातूनच येईल,” असे मत मांडले.
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०- शारीरिक शिक्षण” या विषयावर मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. डॉ श्रद्धा बापट यांनी अध्यापनशास्त्रावर माहिती देत कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर केली. लक्ष्मण चलमले यांनी “ऑलिम्पिक मधील भारत ” या विषयावर आपले मत व्यक्त केले. नंदुरबार जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी राज्य युवा क्रीडा शिक्षक महासंघटनेचे अध्यक्ष डॉ. मयूर ठाकरे, जगदीश वंजारी, जगदीश बच्छाव, जितेंद्र पगारे आदी उपस्थित होते.